मुक्तपीठ टीम
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मनसेवर भाजपाला पूरक भूमिकेचा आरोप होत आहेत. मात्र, ठाण्यात फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे मंगळवारी फेरीवाला बाहेर आल्यानंतर चोपण्याच्या भूमिकेनंतर बुधवारी राज ठाकरे थेट पिंपळेंना भेटले. त्यातून हिंदुत्वाबरोबरच मराठीत्वावरही आपण ठाम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.
ठाण्याच्या रुग्णालयात पिंपळेंना भेटले ठाकरे
• कल्पिता पिंपळेंना भेटल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांना माहिती दिली.
• तब्बेतीची विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो.
• अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत.
• आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं.
• जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय.
• अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे.
• पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे.
• पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.
फेरीवाल्यांमधील माफियांचा माज
• ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळेंच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपाचे पथक गेले होते.
• या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याने अचानक धारदार कोयता काढून कल्पिता पिंपळेंवर हल्ला केला.
• बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली.
• बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे.
• कल्पिता पिंपळे यांना सुरुवातीला जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
• आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हल्ल्यानंतर पिंपळेंची एकनाथ शिंदेंनीही घेतली होती भेट
• फेरीवाल्या माफिया अमरजित यादवच्या हल्ल्यात बोटे गमावलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं भेट घेतली होती.
• त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली आहे.
• आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटकही केली.
• ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
• अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.