मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद मनसेसाठी भोंग्यांवरील अजानविरोधातील भोंग्यावरील हनुमान चालिसा आंदोलन हे काही दिवसांपुरता अजेंडा नसल्याचं स्पष्ट करणारी ठरली. राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात अजेंडा सांगितला, “महाराष्ट्रातील मनसैनिक, हिंदू बांधवांना सांगायचं आहे, हा विषय एक दिवसाचा नाही. हे आवाज बंद व्हायला हवेत.. परत एकदा सांगतो, हा विषय एक दिवसाचा नाही, हा विषय कायम स्वरुपी राहणार, जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत राहणार.” थोडक्यात सध्या तरी मशिद, अजान आणि भोंगे हा मनसेसाठी दीर्घकालीन अजेंडा असल्याचे राज ठाकरेंच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
कायद्याचे पालन करणाऱ्या आमच्या लोकांवरच कारवाई का?
आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून मला फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरुनही अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत, माहिती मिळत आहेत. पोलिसांचे फोन येत आहेत, अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलिस नोटीस पाठवत आहेत, पकडत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबतच का होते हा आमचा प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार?
९०-९२ टक्के मशिदींमध्ये अजान नाही! ‘त्या’ १३५ मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का?
जवळपास ९०-९२ टक्के मशिंदींमध्ये महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. मशिदीमधील मौलवींचं मी आभार मानेन, आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत १ हजार १४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये सकाळची अजान ५ च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ज्या १३५ मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार?
मंदिरांवरील भोंग्याचाही त्रास होत असेल तर बंद करा!
हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे. मला क्रेडिट नको. आम्ही गोष्टी सांगितल्या, त्या अनेक मौलवींना समजला, सरकारमध्ये पोहोचला, पोलिसांनाही धन्यवाद, त्यांनाही नीट समजलं.
हा सर्वसमावेशक प्रयत्न होता, लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा.
अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना परवानगी कशी?
मला काल नांगरे पाटलांनी सांगितलं, इतके अर्ज भोंग्यांसाठी आले आणि इतक्यांना परवानगी दिल्या. आता मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता? मी आताची पत्रकार परिषद घेणं हे सकाळच्या अजानपुरता विषय नाही. दिवसभर जी अजान दिली जाते, बांग दिली जाते, त्या त्यावेळी आमची लोकं हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणार.
३६५ दिवसांसाठी परवानगी कशी?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकवस्तीत ५५ डिसेबिलपर्यंत मर्यादा आहे. काल नांगरे पाटलांनी मला सांगितलं परवानगी दिली आहे..माझा प्रश्न आहे, ३६५ दिवसाची परवानगी कशी असू शकते? आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता, सणासुदीची १०-१२ दिवसाची परवानगी देता.. मग यांना ३६५ दिवस कशी?
प्रार्थना मशिदीत करा!
यांनाही दिवसाची दररोज परवानगी हवी, न्यायालयाच्या नियमात बसून ४५-५० डेसिबलप्रमाणे, घरातील मिक्सरच्या आवाजाएवढा हवा. मी सांगितलं होतं हे भोंगे आधी उतरवा, पोलिसांना एकच धंदा आहे का रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचं? तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, मशिदीत म्हणा. तुम्हाला माईक आणि स्पीकर कशाला लागतो? कुणाला ऐकवायचं आहे.
भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील!
आमची मागणी आहे हे भोंगे उतरले पाहिजे, जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील… आमचं आंदोलन एक दिवसापुरतं नाही, जोपर्यंत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील.. आज अजान दिली नाही म्हणून आम्ही खूश होणार नाही, दिवसभरात ज्या ज्या वेळी अजान लागेल त्या त्या वेळी हनुमान चालिसा लागेल. हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.
आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड का?
संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा? आम्ही शांततेत सांगतो, तर पोलिसांनी आणि सरकारने ऐकून घ्यावं.. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना धरपकड का करतंय? मोबाईलच्या काळात माणसं पकडून काय होणार आहे? अजून ६०-७० च्या दशकात आहात का? राज ठाकरेंचं भाषण सुरु झाल्यावर वीज बंद करुन भाषण थांबणार आहे का?
हा विषय एक दिवसाचा नाही!
महाराष्ट्रातील मनसैनिक, हिंदू बांधवांना सांगायचं आहे, हा विषय एक दिवसाचा नाही, ज्या ज्या मशिदीतील मौलवी ऐकणार नाहीत, जिकडे लाऊडस्पीकर लावतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा.. मी पोलिसांच्या कारवाईची वाट पाहतोय, ‘त्या’ १३५ मशिदींवर कारवाई करणार की नाही तर आम्हाला बघायचं आहे.
जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत विषय राहणार!
ते जर त्यांच्या धर्माशी घट्ट राहणार असतील तर आम्हीही राहू. या महाराष्ट्रात शांतता राहावी, जेव्हा केव्हा सणाला, कार्यक्रमाला लाऊडस्पीकर लागतील तेव्हा परवानगी द्या… पण दररोज हे कोण ऐकेल? लहान बाळ, आजारी लोकांना त्रास का? माणसापेक्षा यांचा धर्म मोठा आहे का? जी प्रार्थना आहे ती मशिदीत करा.. हे आवाज बंद व्हायला हवेत.. परत एकदा सांगतो, हा विषय एक दिवसाचा नाही, हा विषय कायम स्वरुपी राहणार, जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत राहणार.