मुक्तपीठ टीम
मुंबई – दिल्ली हा प्रचंड वाहतूक असलेला महामार्ग. वलसाड सारखं गजबजलेलं शहर. तेथे सातत्यानं वाहतूक असणाऱ्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम. वाहतूक व्यवस्थापन करत पूल बांधणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण रेल्वेने ते करून दाखवले आहे. तेही अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी वेळेत.
भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुजरातमधील वलसाड रोड येथील उड्डाणपुलाच्या तोडणी आणि पुनर्बांधणीचे काम केले. सरकारी कंपनीने खासगी कॉर्पोरेटलाही प्रेरणा देणारी कामगिरी बजावली आहे. या उड्डाणपुलाच्या मुखाशी आधीच तयार केलेले १६ बाय १० मीटर आकाराचे प्रीकास्ट बॉक्स लावण्यात आले. त्यानंतर काम करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न आणता, अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी वेळेत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.
गुजरात राज्यातील विविध संस्था आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधत, मुंबई-दिल्ली या प्रचंड वाहतुकीच्या महामार्गावरील हा उड्डाण पूल पूर्ण करण्यात आला.दोन जूनपासून या मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता.
पार्श्वभूमी
पश्चिम समर्पित मार्गिकेवरील, वैतरणा-सचिन भागात, वलसाड गावात जाण्यासाठीच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. मात्र या भागातल्या अनेक मर्यादा आणि रेल्वेरूळ टाकण्याच्या कामामुळे इथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करणे आव्हानात्मक होते. या मार्गिकेवर, अत्याधुनिक पद्धतीने नवे रूळ टाकण्याचे काम सुरु असून उड्डाण पुलाच्या कामामुळे हे काम बाधित होण्याची शक्यता होती.
तोडगा
या समस्यांवर तोडगा शोधून प्रकल्प पूर्ण करण्याचे काम या चमूने स्वीकारले. समस्या निवारणासाठी अनेक बैठकांमधून चर्चा-सल्लामसलत झाल्यावर एक अभिनव तोडगा शोधून काढण्यात आला. या उड्डाणपुलाच्या मुखाशी आधीच तयार केलेले १६ बाय १० मीटर आकाराचे प्रीकास्ट बॉक्स लावण्यात आले. त्यातही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेल्या अशा या रस्त्यावरची वाहतूक थांबवून हे काम करणे सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे, हे पूर्ण काम केवळ 20 दिवसात संपवण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले, आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली.
२० दिवस, १५०जणांची टीम!
या मोठ्या भागाचे प्री कास्टिंग करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली होती. लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध असतांनाही वरिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखालील १५० जणांच्या चमूने, अहोरात्र काम करून कास्टिंगचे काम वेळेत पूर्ण केले. या काळात वलसाडच्या जिल्हा प्रशासनाने वाहतूक ब्लॉक घेण्यास मदत केली.