मुक्तपीठ टीम
रायगड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. 10 आणि 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी 12 ते 20 किमी वेगाने वारे वाहण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हे दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील 103 गावे दरडग्रस्त
रायगड जिल्ह्यात महाड 49, पोलादपूर 15, रोहा 3, म्हसळा 6, माणगाव 5, पनवेल 3, खालापूर 3, कर्जत 3, सुधागड 3, श्रीवर्धन 2, तर तळा तालुक्यात 1 अशी एकूण 103 गावे ही दरड कोसळण्याच्या धोक्याच्या सावटाखाली आहेत.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचे संकेत दिले असल्याने या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टी काळात नदी, समुद्र, धरण परिसरात जाऊ नका
अतिवृष्टी काळात समुद्र, नदी, धरण या ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असतो. या ठिकाणी काहीजण उत्साहाच्या भरात पोहण्याचा आनंद लुटण्यास जातात. अशा वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी काळात विशेषतः युवकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवाहन केले आहे.
समुद्र, खाडीकिनारी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
अतिवृष्टी आणि भरतीमुळे समुद्र, खाडी भागात किनाऱ्याला समुद्राचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. समुद्र, खाडी किनारी गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, अशा वेळी नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ मदत मागावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिवसभरात सरासरी ५८ मि.मी. पावसाची झाली नोंद
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 58.99 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 144.18 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे..
अलिबाग-60.00 मि.मी., पेण- 58.00 मि.मी., मुरुड-65.00 मि.मी., पनवेल-113.60 मि.मी., उरण-40.00 मि.मी., कर्जत- 41.80 मि.मी., खालापूर- 53.00 मि.मी., माणगाव- 53.00 मि.मी., रोहा-64.00 मि.मी., सुधागड-48.00 मि.मी., तळा-56.00 मि.मी., महाड-53.00 मि.मी., पोलादपूर-43.00 मि.मी, म्हसळा- 53.00 मि.मी., श्रीवर्धन- 103.00 मि.मी., माथेरान- 39.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 943.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 4.59 टक्के इतकी आहे.