Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“गंगामाई घरी पाहुणी आली, अन् शरद पवारांवरील प्रेमाची चर्चा झाली…”

September 6, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
NCP

रफिक मुल्ला / व्हा अभिव्यक्त! 

जुलैमध्ये प्रचंड पाऊस पडला, महाराष्ट्रभर महापुर आला.. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ओल्या संकटाने हजारो संसार उघड्यावर पडले.. त्यात एक संसार बुडून गेला- तो शफिकभाईंचा..!

आता हे शफिकभाई कोण.. आणि त्यांचा संसार उघड्यावर पडला त्यात विशेष काय..? नेते – अभिनेत्यांच्या कुत्र्यामांजराच्या आणि त्यांच्या जन्मलेल्या मुलांच्या कौतूकाच्या बातम्या महत्वाच्या असताना हे कोण ज्यांच्यावर लिहलं – बोललं गेलं पाहिजे..? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. पण त्यांची कहाणी विशेष यासाठी की ती संख्येने करोडो असलेल्या बिनचेह-याच्या कार्यकर्त्याची प्रातिनिधिक कहाणी आहे.. त्यापेक्षाही शरद पवार यांच्या कार्यकर्त्याची कहाणी आहे.. साधारण बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्या कार्यकर्त्याचे नेत्यावरील निस्सीम प्रेम हा कहाणीचा विषय बनू शकतो.. अलिकडे महाराष्ट्रात फक्त राज ठाकरे यांच्या नशीबात असे चाहते कार्यकर्ते आहेत.. तिकडे दक्षिणेकडील कार्यकर्त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कार्यकर्ते जीव देणारे नसले तरी निष्ठा वाहणारे असतात, किमान या पिढीतले तरी.. त्यांनी आपल्या नेत्यासाठी जीव दिलेला नाही पण जीवन दिलेले आहे..त्यातलेच हे एक शफिकभाई…!

NCP

सैनिक शाळेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कम्पाऊंडजवळच्या वस्तीमधील एका भाड्याच्या छोट्याशा घरात शफिकभाई राहतात.. जुलैमधील पावसामुळे शाळेच्या जवळून वाहणा-या ओढ्याचा मार्ग बंद झाल्याने कंपाऊंडच्या भिंतीजवळ प्रचंड पाणी साचले आणि भिंत अशी तुटली की रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शफिकभाईंच्या घरात भिंतीचे दगड भरले गेले.. किडूक मिडूक म्हणता येईल अशा गरजेच्या थोड्याशा वस्तू, संसार म्हणून वर्षानूवर्षे जमा केल्या होत्या, त्या पाण्याने खराब झाल्या.. काही वाचवण्याची संधी न मिळाल्याने सगळंच नुकसान.. सारा संसार वाहून गेला.. त्यांचा फोन आला- “भाई आज मोडून पडलो.. भेटला तर बरे होईल.. तुमच्या भेटण्याने उभारी येते..” साता-याला जाऊन त्यांना भेटायला गेलो, ओल्याचिंब घरात सामान असे काहीच नाही, जे होते ते पाणी ओसरून गेल्यावर खराब झालेलं.. समोर वॉशिंग मशीन.. काही दिवसापूर्वी भेट झाली तेव्हा म्हणाले होते, ” भाई, आज जरा हलकं वाटतंय, आणि डोक्यावर बोजाही आलाय.. वर्षानुवर्षे हाताने कपडे धुतल्याने पत्नीचे हात फार खराब झाले आहेत, अगदी त्वचेच्या डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली म्हणून फार धाडस करुन हफ्त्यावर वाशिंग मशीन घेतली.. तिला काही देता आले म्हणून सुख आणि हप्त्याचे ओझे आले डोक्यावर म्हणून बोजा…”

NCP

मी भेटायला गेलो तेव्हा, तीच मशीन समोर होती, खराब झाली होती.. दगडाच्या मा-याने फुटली होती.. जे असं सामान होतं ते सगळं गेलं.. दुसरीकडे समोर चटईवर वाळायला पसरलेले हजारो फोटो त्यांचा सारा जीवनपट विरोधाभासासकट मांडत होते.. एवढ्या पुरात तो खजिना शफिकभाईंनी वाचवला होता.. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यासोबत फोटो.. मैत्री वाटावी असे… पक्षाध्यक्षांसोबत अनेक… दाढी नसताना, ती ठेवल्यावर, काळी दाढी असताना… आता केस पांढरे होऊ लागलेत म्हणजे अलिकडचेही… अलिकडे वय दिसू लागलेय.. सांगायला पदही आहे.. सातारा जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग.. कळत्या वयापासून साहेबांचे कार्यकर्ते.. फोटोतली कमाई प्रत्यक्षात काहीच नाही…आजपर्यंत ना स्वत:चे घर ना साधी दुचाकी..मिळवलं म्हणावं असं काहीच नाही.. पण कोणीही भेटलं की चेहरा सतत हसतमुख आणि प्रसन्न..!

 

सातारा पक्षाचा बालेकिल्ला.. पक्ष सत्तेत दीर्घकाळ असल्याने साता-याला भरभरुन मिळतं.. त्यामुळे शफिकभाईंचे इतर सहकारी चारचाक्या बदलत राहीले तरी भाईंची नैसर्गिक दोन चाकी म्हणजे पाय त्याच तडफेने पक्षासाठी पळत असतात.. पक्षाचे कार्यक्रम, मेळावे, सभा कधी चुकल्या नाहीत. साताऱ्याच्या एसटी स्टँडमागे असलेल्या राष्ट्रवादी भवनाचे आणि त्यांचे नातेच जीवाभावाचे..

NCP

बरं शफिकभाई पदवीधर.. शिक्षित.. त्यावेळी खूप प्रयत्न करुन नोकरी मिळाली नाही, साहेबांच्या प्रेमाखातर राजकारणात..निष्ठेमुळे बराच काळ पदावरही.. बाकी इतर अध्यक्ष चारचाकीशिवाय कुठेच जाणार नाहीत.. तसं राजकारण होतही नाही, चालतही नाही… दीर्घकाळ पद आहे, कारण साहेबांशी थेट ओळख.. आबा, दादा, जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे, जिल्ह्यातले वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि दोन्ही राजे.. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे.. सगळेच चांगल्या ओळखीचे.. कुणाचीच कसलीही तक्रार नाही.. ती का तर पक्ष म्हणून सगळ्यांचे राबून काम करणारा, आपल्या समाजात इज्जत असलेला.. महत्वाचे म्हणजे निवडणूका आल्या की दारु पाजायची आहे, बोकड आणून खाना खिलाना है.. अशा कोणत्याही कारणास्तव पैसे न मागणारा.. निवडणुकीत कार्यक्रम लावून नेत्यासाठी मत मागणारा, नेता निवडून गेला की मांडव – खुर्च्यावाल्यांची राहिलेली उधारी न मिळाल्यास किंवा नेत्याच्या मधल्या कार्यकर्त्यांने खाल्ल्यास.. फार रोष न ठेवता थोडी थोडी करुन स्वत: भागवणारा पदाधिकारी दुसरा कोण मिळेल.. अलिकडे साता-यातलं राजकारण बदललं.. दोन्ही राजे आणि इतर अनेक नेते भाजपमध्ये गेले, काही जाता जाता राहीले.. प्रत्येकाने शफिकभाईंना आपल्या सोबत येण्याची विनंती केली, काहींनी ऑफर दिली पण साहेबांना सोडून कुठेही नाही.. अशी ठाम भूमिका घेत शफिकभाई पडत्या काळात साहेबांसोबत राहिले..

NCP

आता पदं नसताना स्कॉर्पियो, बोलेरो आणि फॉर्चुनर घेऊन फिरणारे फक्त सत्तेत राहिलेले कार्यकर्ते एकिकडे असताना शफिकभाई पद असूनही असे का..? शफिकभाई, रोज पाच वेळा नमाज पठण करतात.. कुणा गरीबाच्या कामासाठी चालत फिरत नेत्यांची शिफारस पत्र घेऊन विविध कार्यालयात जातात, त्यांच्याकडे असेच गरजू गरीब साधं कामही अडलेले असेच लोक येतात. अशा या कामात त्यांना कोण पैसे देणार..! सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बदल्या कर, बिलं काढून दे, कंत्राटं घे, किवा लाभाच्या पदावर बसून कमावतात… फार नाही तर भ्रष्ट चोर अधिकारी – कंत्राटदारांवर मोर होतात.. कुठून तरी जुगाड लावतात..चांगल्या-वाईट मार्गाने पैसे आले की गाडी – घोडे- कार्यकर्ते- पद-त्यातून पुन्हा पैसा…असं सगळं ओघानं आलंच…

 

पाण्याने भिजलेले ते चटईवर वाळत घातलेले फोटो असा सगळा विरोधाभास कथन करत होते..अलिकडेच अशाच एका गरजूचे काम करायला निघाले असताना घसरून पडले.. पाय फ्रॕक्चर झाला.. जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा प्लास्टर काढले होते, पायाची सूज तशीच होती..त्यात हे पुराचे संकट..काही नेते येऊन भेटून गेले होते..त्यांनी मदत केली की नाही माहीती नाही, जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यावरुन वाटलं कुणी मदतीचा हात दिला नसावाच, पण स्थानिक नेते किमान येऊन भेटल्याचे त्यांना समाधान होते..! शफिकभाईंचा एक जुना किस्सा आठवला.. एकलत्या एका तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेव्हा लोकसभेच्या निवडणूका होत्या..पद आणि साहेबांच्या निष्ठेपायी त्यांनी मनावर प्रचंड दु:ख घेऊन काम केले..अलिकडे झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत आदल्या दिवशी वडील गेलेले असतानाही दुस-या दिवशी जाऊन मतदान केले.. कारण एक मतही महत्वाचे आहे.. जर स्पर्धात्मक स्थिती असेल तर साहेबांच्या राजकारणाला ही मदत होईल..ज्यांच्यावर कोणताही पक्ष उभा असतो..जे खरे निष्ठावान, ते हे असे कार्यकर्ते..! साताऱ्यात राष्ट्रवादी पक्षात काही असे चेहरे आहेत ज्यांनी स्वतःला पक्षासाठी वाहिले आहे. त्यातला एक कसल्याही परिस्थितीत हसरा चेहरा म्हणजे शफिकभाई. साहेबांच्या घरातले, राजकारणात असलेल्या – नसलेल्यांची निष्ठाही एवढी ठाम असेल का..? शंका आहे…!

NCP

शफिकभाई हे प्रातिनिधिक आहेत.. सगळ्या पक्ष संघटनेत असे कार्यकर्ते आहेत..हजारो-लाखो असे कार्यकर्ते जे इच्छा असूनही काही मागू शकत नाहीत..पण वर्षानुवर्षे ते त्याच तडफेने काम करत राहतात.. सुदामा जेव्हा श्रीकृष्णाकडे गेला तेव्हा स्थिती खराब असूनही आणि मागायला येऊनही तो काहीच मागू शकला नाही..पण कृष्णाने ते ओळखून तो घरी पोहचण्याआधी त्याची गरज पूर्ण केली.. नेत्यांनी अशा न बोलणा-या, पण प्रेम-निष्ठेपायी आयुष्य वेचणा-या कार्यकर्त्यांना हात द्यायला हवा.. त्यांना मदत करायला हवी.. न मागताही एखादे पद द्यायला हवे.. एखादे काम द्यायला हवे.. ज्यातून किमान त्यांची रोजी रोटी चालेल.. किमान त्यांना थोडा सन्मान मिळेल. आयाराम गयारामांची आणि संधीसाधूंची चलती असताना तुलनेत किमान हे निष्ठावान विनोदाचा विषय तरी होणार नाहीत..!!

 

safif mulla

(रफिक मुल्ला हे ज्येष्ठ पत्रकार असून महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण यांचा त्यांचा जवळून अभ्यास आहे.)


Tags: sataraखासदार उदयनराजे भोसलेशफिकभाईशरद पवारसातारा
Previous Post

जळगावच्या पारोळा व एरंडोल तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबीरं

Next Post

“अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी”

Next Post
BJP-NCP

"अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!