मुक्तपीठ टीम
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने विविध क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या मदतीने तयार केलेल्या ५३ मौलिक पुस्तकांचे आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
५३ पैकी ३६ पुस्तके नवीन असून १७ पुस्तकांचे पुनर्रमुद्रण करण्यात आले आहे. ही सर्व ग्रंथसंपदा वाचकांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. साहित्य संस्कृती मंडळ अशा मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा यापुढेही अशाच प्रकारे चालू ठेवील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला व या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाच्या मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या.
३६ पुस्तकांची वैशिष्ट्ये
जगभरातील नाट्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ असलेल्या भरतमुनिंचे नाट्यशास्त्र या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचा दुसरा खंड ‘भरतमुनिविरचितं नाट्यशास्त्रम् खंड – दुसरा, अध्याय १३ ते २४ ( मराठी अनुवाद पदच्छेद आणि अन्वयासह)’ , अनु. डॉ. संध्या वीरसिंह पुरेचा, डॉ. श्रीहरी वासुदेव गोकर्णकर हा ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात आला.
जागतिक चित्रपटांचा अर्थ उलगडणारा गणेश मतकरी लिखित ‘चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय’ हा बृहद्ग्रंथ, साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणारा, ‘पुत्र ज्ञानदेवतेचा साहित्याचार्य, महामहोपाध्याय स्व. बाळशास्त्री हरदास गौरवग्रंथ’ हा आशुतोष अडोणी यांनी संपादित केलेला गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.
महानुभावांच्या सांकेतिक शिरलिपी, वज्रलिपी व कवीश्वरी या लिपींचा उलगडा करुन देणारे कार्य विनायक त्र्यंबक पाटील यांनी केलेले आहे. या प्रकल्पातील ‘महानुभाव सांकेतिक शिर लिपी (पोथींसह-लिप्यंतर)’ हा ग्रंथ वाचकांसाठी पर्वणी ठरेल.
सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मराठी मुलखात एक सत्यशोधकीय क्रांतिकारी इतिहास निर्माण केला. २०२३ मध्ये सत्यशोधक समाजास दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या समताधिष्ठित चळवळीचा दीडशे वर्षांचा एकसंध इतिहास जी. ए. उगले यांनी लिहिला असून तो सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास मंडळाच्यावतीने ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यात आला. संत नामदेव आणि त्यांच्या काळातील संतचरित्रांचा परिचय करून देणारा ‘संतशिरोमणी श्रीनामदेव आणि त्यांचे समकालीन संत’ हा सुहास अंजनकर यांनी संपादित केलेला ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
‘सीताबर्डीची लढाई’ हा डॉ. स. मो. अयाचित यांचा ग्रंथ, होळकरशाहीचा समग्र इतिहास अकरा खंडातून प्रकाशित होत असून या प्रकल्पातील पहिले पाच खंड मंडळाकडून प्रकाशित करण्यात येत आहेत. मध्ययुगीन काळातील जैन वाङ्मयातील २४ ग्रंथांचे प्रकाशन मंडळाकडून करण्यात येत आहे. याबरोबरच मंडळाच्या पुनर्मुद्रण योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा इतिहास सांगणारा ‘रायगडची जीवनकथा’ हा ग्रंथ, चां. भ. खैरमोडे यांनी लिहिलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे चरित्र या ग्रंथाचे खंड ९ ते १२ हे चार खंड, ‘लोकसंस्कृतीतील स्त्रीरुपे’ हा ग्रंथ, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या युरोपमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक परिस्थितीचे उत्कृष्ट विवेचन व विवरण करणारा अल्बेर कामू यांचा ‘बंडखोरीचे तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ, भगवान बुद्धांच्या ‘चर्या’ (चरिया म्हणजे सदाचरण अथवा बोधिसत्वाने करावयाची दैनंदिन कर्तव्यकर्मे) चे वर्णन करणारा ‘चरियापिटक’ हा ग्रंथ, भारतीय समृद्ध लोकजीवन आणि लोकसंस्कृतीची ओळख करुन देणारा ‘लोकजीवन आणि लोकसंस्कृती’ हा ग्रंथ, भारतीय वाद्यांचा परिचय करुन देणारा ‘भारतीय वाद्ये’ हा ग्रंथ, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील शिल्पशास्त्राचे, भारतीय स्थापत्त्यविषयातील माहिती देणारा ‘कौटिलीय अर्थशास्त्रातील शिल्पशास्त्र’ हा ग्रंथ, ‘संगीताचार्य पं.विष्णु नारायण भातखंडे’ हा चरित्रग्रंथ प्राचिन मानवी संस्कृती, अवशेष, स्थलांचे अन्वेषण, त्यांचे उत्खनन व त्यांचे प्राचिन वैभव इत्यादीबद्दल माहिती देणारे ‘पुरातत्वविद्या’ हा ग्रंथ याबरोबरच ‘ब्राह्मण’, ‘सौंदर्य शास्त्रावरील तीन व्याख्याने’ व ‘तिसरी लाट’ या तीन पुनर्मुद्रित ग्रंथांचे प्रकाशन देखील मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.