मुक्तपीठ टीम
खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी औरंगाबादेमध्ये लोकचळवळ सुरु झाली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
गेल्या अनेक वर्षात प्रदूषणामुळे औरंगाबादमधील खाम नदीचे रुपांतर नाल्यात झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका, व्हेरॉक, भारतीय औद्योगिक महासंघ आणि इको सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षात खाम नदीचे पुनरूज्जीवन करण्याची योजना मनपाने आखली आहे.
मनपाने खाम नदीच्या वेगवेगळ्या भागाची साफसफाई करण्यासाठी साप्ताहिक लोकसहभाग मोहीम जाहीर केली. दर शनिवारी सकाळी ७ ते १० च्या सुमारास ही मोहिम असते. मनपाच्या या नव्या उपक्रमास नागरिक, सामाजिक गट आणि स्वयंसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी नदीकाठी रोपांची लागवड केली. अर्जुन, अश्वगंधा, स्वयंसेवक गट शिरीष, कांचन, करंज, खैर आणि अडुलसा अशा ३४ देशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
मनपाचे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कार्यालयाजवळील नदीत टाकलेल्या पॉलिथीन पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य कचरा या मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आला.
मनपाचे आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसहभागातून खाम नदीचे पर्यावरणीय आरोग्य लवकरच सुधारले जाणार आहे. “माझी वसुंधरा” या मोहिमेअंतर्गत हे काम केले जाणार आहे. शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने या मोहिमेसाठी पुढाकार घेतला. कॉर्पोरेट संस्थाही या मोहिमेस सहकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
पाहा व्हिडीओ: