मुक्तपीठ टीम
गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्र! महाराष्ट्र म्हटलं की गणेशोत्सव!! एवढं जवळचं नातं असणारा उत्सव म्हणजे बाप्पांचा उत्सव. महाराष्ट्र आणि खास करुन मुंबई, पुण्यात गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. यंदाही कोरोनाचं सावट असल्याने नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ आपल्याला महाराष्ट्रात झाला, हा आजपर्यंत आपल्याला माहित असलेला इतिहास आहे. मात्र, आता बिहारमधील काही तज्ज्ञांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्रात नाही तर बिहारमधील मिथिलामध्ये झाल्याचा दावा केला आहे. इतिहासकारांनी केलेल्या दाव्यानुसार देशात सर्वात आधी बिहारमधल्या मिथिलामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
काय आहे बिहारमधील माध्यमांचा दावा?
- महाराजा रुद्र सिंह यांचे नातू आणि महाराजा लक्ष्मेश्वर सिंह यांचे भाऊ आणि आप्त सचिव बाबू जनेश्वर सिंह यांनी १८८६ च्या आसपास सध्याच्या मधेपुरा जिल्ह्यातल्या शंकरपूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.
- महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला तो १८९३ मध्ये, म्हणजे बिहारमधील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शुभारंभाच्या सात वर्षांनी असा दावा करण्यात येत आहे.
- सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रणेता बिहार असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ अलाहाबाद महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. सर गंगानाथ झा यांच्या आत्मचरित्रामध्ये असलेल्या उल्लेखाचा दाखला दिला जात आहे.
सर गंगानाथ यांच्या आत्मचरित्रात उल्लेख
- १८९३ मध्ये दरभंगामध्ये येण्यापूर्वी बाबू जनेश्वर सिंह यांनी शंकरपूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.
- सर गंगानाथ यांनी उत्सवात पुरोहिताची भूमिका बजावली होती.
- नोकरी गमावल्यानंतर सर गंगानाथ यांनी अलाहाबादकडे प्रस्थान ठेवलं.
- सर गंगानाथ यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केल्यानुसार फक्त शंकरपूरच नव्हे तर दरभंगा, राजनगर यासारख्या महत्वपूर्ण ठिकाणीही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात होता.
- दरभंगाच्या महाराजांच्या कार्यकाळात कोसी क्षेत्रात शंकरपूरचं वेगळंच महत्व होतं.
बाबू जनेश्वर सिंह सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते?
- सार्वजनिक गणेशोत्सव राजा आणि प्रजा एकत्रित साजरा करत होते.
- १९३४ पर्यंत दरभंगा हे समृद्धीचं प्रतिक होतं. मात्र भूकंपाचे धक्के बसल्यानंतर याला पूर्णविराम मिळाला.
- बाबू जनेश्वर सिंह यांनी आपल्या कार्यकाळात अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या.
- त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये ग्रंथालय, संस्कृत विद्यालय, धर्मशाळा यांचा समावेश होता.
- आजवर सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते म्हणून लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केला जातो. आता मात्र या बिहारमधील दाव्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते बाबू जनेश्वर सिंह असल्याचा नवा दावा समोर आला आहे.