मुक्तपीठ टीम
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी हे वर्ष खास उल्लेखनीय आहे. गेली पाच वर्षे जे घडले नाही ते या कोरोना संकटाच्या वर्षात या बँकांनी करून दाखवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी यावर्षी ३१ हजार ८२० कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर या बँकाना पुन्हा नफा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे कौतूक केले आहे, मात्र नव्या आव्हांनाचीही जाणीव करून दिली आहे.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसबी) कामगिरीचा त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. २०१४ मध्ये अस्तित्वात असलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, सरकारने आखलेल्या मान्यता, संकल्प, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा 4R धोरणामुळे २०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नफा, पुरेसे भांडवल ,अनुत्पादित मालमत्तेत कपात, फसवणूकीच्या घटनांचा तपास आणि बाजारातून निधी संकलित करण्याच्या विविध मापदंडांवर नाट्यमय सुधारणा घडून आली, असे या आढाव्यात नमूद करण्यात आले.
4Rधोरणाचा प्रभाव-२०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा धावता संक्षिप्त आढावा
- पाच वर्षात सर्वाधिक ३१,८२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा
- एकूण अनुत्पादित मालमत्ता ९.१% (१४.५८% – मार्च २०१८)
- निव्वळ अनुत्पादित मालमत्ता ३.१% (७.९७% – मार्च २०१८)
- तरतूद प्रमाण गुणोत्तर ८४% (६२.७% – मार्च २०१८)
- १४.०४% भांडवल पर्याप्तता (किमान निर्धारित – 10.875%)
- ५८,६९७ कोटी रुपये, कर्ज आणि इक्विटीच्या स्वरूपात उभारले,त्यापैकी १०,५४३ कोटी रु. केवळ इक्विटी
पायाभूत सुविधा, उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना आणि निर्यातीसाठीच्या राष्ट्रीय उपक्रमांसाठी, ग्राहक सेवेसह सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगांना आणि दुर्लक्षित क्षेत्रांना आधार देण्यासाठी पतपुरवठ्यात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज वित्तमंत्र्यांनी या बैठकीत अधोरेखित केली. विशेषत: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि आणि किरकोळ क्षेत्रासाठी परवडणाऱ्या कर्जाची उपलब्धता वाढवण्यासाठी सह -कर्ज देण्याच्या आवश्यकतेवर सीतारामन यांनी विशेष भर दिला. यासोबतच, कर्जवसुलीसाठी सातत्याने प्रयत्न आणि तंत्रज्ञानात विशेषतः डिजिटल कर्ज आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात सतत प्रयत्न आवश्यक आहेत, असे त्या म्हणाल्या. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर ,आर्थिक समावेशकतेच्या दिशेने पुरेसा फायदा झाला मात्र या प्रयत्नांमध्ये विशेषतः सातत्य राहणे आवश्यक आहे. शेवटच्या पुरुष आणि स्त्री पर्यंत सर्व सरकारी घोषणांचा फायदा पोहोचणे सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याच्या सूचना वित्त मंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिल्या.
निर्यातदारांच्या गरजा वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने, निर्यात प्रोत्साहन संस्था तसेच उद्योग आणि वाणिज्य संस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश सीतारामन यांनी बँकांना दिले. बँकांना भारतीय निर्यातदार संघटना महासंघाशी (एफआयईओ ) नियमित संवाद साधण्याचे निर्देशही देण्यात आले होते जेणेकरून निर्यातदारांना विविध बँकांमध्ये जाऊन व्यवहार करण्याची गरज भासणार नाही. सध्याच्या बदललेल्या काळानुसार, उद्योगांना आता बँकिंग क्षेत्राबाहेरूनही निधी उभारण्याचा पर्याय वित्तमंत्र्यांनी अधोरेखित केला. बँका स्वतः विविध मार्गांनी निधी उभारत आहेत.कर्जाची गरज असलेल्या क्षेत्रांशी संबंधित नवीन बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे,असे त्या म्हणाल्या. निर्यातदार तयार करण्यासाठी आणि त्याद्वारे ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेला साहाय्य करण्यासाठी एका विशिष्ट क्षेत्रातीलउद्योगांना हाताशी धरून बँका महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे देखील निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवल्याप्रमाणे, बँकांनी ईशान्येकडील सेंद्रिय फळ क्षेत्राच्या मागण्या पूर्ण करणे आवश्यक आहे, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधले.
विशेषतः देशाच्या ईशान्य भागाबद्दल बोलताना वित्तमंत्री म्हणाल्या की, ईशान्येकडील राज्यांच्या लॉजिस्टिक आणि निर्यात गरजांबद्दल वैयक्तिकरित्या लक्ष घालणे आवश्यक आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये चालू आणि बचत खात्यातील ठेवी जमा होत आहेत आणि बँकांनी त्या प्रदेशात अधिक पतपुरवठा विस्तार करण्याची सुविधा दिली पाहिजे, असे वित्तमंत्री म्हणाल्या.
एकंदर, गरज असेलल्या लोकांपर्यंत पतपुरवठा पोहोचण्यासाठी सीतारामन यांनी बँकांना राज्य सरकारांच्या सहकार्याने काम करण्याचे निर्देश दिले.पतपुरवठ्याबद्दल वित्तमंत्री म्हणाल्या की, ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२१ दरम्यान, बँकांनी एक जनसंपर्क अभियान हाती घेतले होते आणि ४.९४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले होते आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना या वर्षी देखील अशीच कामगिरी करण्याची त्यांनी सूचना केली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीमध्येही इतरांपेक्षा उजवी ठरली आहे. या तिमाहीत एकूण नफा १४,०१२ कोटी रुपये झाला आहे आणि निव्वळ नफा, शुल्क उत्पन्न तसेच संचयी उत्पन्नात सातत्याने वाढ दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर अडथळे आले असतांनाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ही कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीच्या एकूण १०,५४३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ७,८०० कोटी रुपये समभागांच्या मार्गाने उभारत पीएसबीने बाजारपेठेचा विश्वास वृद्धिंगत केला आहे. याच काळात, बँकांचे विलिनीकरणही झाले, आणि त्याचे फायदे, अधिक कार्यक्षमता, अधिक व्यावसायिकता, कमी खर्च आणि मजबूत भांडवलाचा राखीव साठा यांच्या रूपाने दिसत आहेत.
डिजिटल बँकिंग, डिजिटल कर्ज, वैशिष्ट्यपूर्ण मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग, अधिक ग्राहक-अनुकूल वैशिष्ट्ये आणि प्रादेशिक भाषेतून ग्राहकांशी संवाद साधून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहक सेवा सुधारून स्वतःची व्याप्ती वाढवली आहे. डिजिटल माध्यमांच्या मार्फत, डिजिटल स्वरुपात किरकोळ कर्जमागण्या स्वीकारण्यास सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँका सक्षम झाल्या आहेत, या अंतर्गत, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४०,८१९ कोटी रुपये किरकोळ कर्ज वितरण देखील करण्यात आले आहे. ग्राहक-गरज-प्राणित, विश्लेषणावर आधारित कर्ज देण्याच्या ऑफर्सवर भर दिल्यामुळे, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सात मोठ्या सार्वजनिक बँकांद्वारे ४९,७७७ कोटी रुपये किरकोळ कर्ज वितरण नुकतेच करण्यात आले आहे.
तसेच, सार्वजनिक बँकांचे जवळपास ७२% आर्थिक व्यवहार आता डिजिटल माध्यमांद्वारे केले जातात, ज्यामुळे आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये डिजिटल माध्यमांचा सक्रियपणे वापर करणाऱ्या ३.४ कोटी ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये दुप्पट होऊन ७.६ कोटींवर पोहोचली आहे.
महामारीच्या काळात सार्वजनिक बँका, खाजगी बँका आणि बिगर वित्तीय पतसंस्थानी आकस्मिक कर्ज हमी योजनेद्वारे (ईसीएलजीएस) १.१६ कोटी कर्जदारांना आधार दिला. ईसीएलजीएसच्या यशामुळे सरकारने २८ जून २०२१ रोजी केलेल्या घोषणांचा एक भाग म्हणून ईसीएलजीएस ४.५ लाख कोटीपर्यंत वाढली आहे. यासोबतच, आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म वित्त संस्था MFIs आणि भांडवली खर्चासाठी (CAPEX) हमी योजना यासारखे इतर उपक्रमही आहेत. MFI योजनेसाठी, गेल्याच आठवड्यात १,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, संभाव्य मध्यम आकाराच्या आणि छोट्या कंपन्यांना निर्यातीमधील नवे जेते म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी “उभरते सितारे योजना” सुरू करण्यात आली.
पीएसबीच्या कामाचा आढावा घेताना, अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी वर्धित प्रवेश आणि सेवा उत्कृष्टता (EASE) 4.0 सुधारणा कार्यसूची जारी केली आणि EASE 3.0 (आर्थिक वर्ष २०२०-२१) वार्षिक अहवाल जाहीर केला.