मुक्तपीठ टीम
केवळ गुन्हेगार आणि दहशतवादीच नाही तर कोरोनासारख्या महामारीशी लढण्यातही पुढे असतात ते मुंबई पोलीसच! मुंबई पोलीस दलातील आणखी एक पोलीस अधिकारी आज कोरोनाशी लढताना शहीद झाले. वाकोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर बीकेसीच्या कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरू होते. तिथे उपचार सुरू असताना पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनानमुळे आतापर्यंत १०१ पोलीस शहीद झाले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर बीकेसीच्या कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे वय ५४ होतं. उपनिरीक्षक दगडे यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.
Mumbai Police regrets to inform about the unfortunate demise of PSI Mohan Dagade from Vakola Police Station. Shri. Dagade was battling Coronavirus.
We pray for his soul to rest in peace. Our thoughts and prayers are with the Dagade family.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 12, 2021
पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कार्यकाळ
• पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे हे मूळचे साताऱ्याचे रहिवाशी आहेत.
• १९८८ साली ते पोलीस दलात रुजू झाले.
• त्यांनी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात काम केले.
• तीन वर्षांपूर्वी त्यांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती.
• बढती नंतर सुरुवातीला ते साकीनाका त्यानंतर सध्या वाकोला पोलीस ठाण्यात काम करत होते.
आतापर्यंत १०१ पोलीस शहीद
• कोरोना संसर्गाची झळ पोलीस खात्यालाही बसत आहे.
• आता पर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
• लॉकडाऊन काळात मुंबई पोलीस रस्त्यावर जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
• मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत ७९०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
• सध्या मुंबईत ४१५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.
• पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहे.
• मुंबई पोलीस दलातील ८० टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.