प्रा. हरी नरके
भाषा हे संवाद व अभिव्यक्तीचे चलन होय. लोक आपले दैनंदिन व्यवहार भाषेच्या माध्यमातून करतात. ज्ञान, संस्कृती, कला, जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन हे भाषानिहाय वेगवेगळे असू शकतात. भाषा संस्कृतीची जणुकं वाहून नेतात. भाषांना स्वत:चे सार्वभौमत्व असते.
हे विश्व सामान्यपणे १४००कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी ४५०कोटी वर्षांपुर्वी जन्माला आली असे मानले जाते. माणसाचा पुर्वज १ कोटी वर्षांपुर्वी जन्मला. पाच लाख वर्षांपुर्वीचे आपले पुर्वज व आपण यात महत्वाचा फरक म्हणजे आपण भाषा बोलू शकतो. त्यांना भाषा माहित नव्हती. हावभाव, संगीत, स्वर ही अभिव्यक्तीची माध्यमे टप्प्याटप्प्याने विकसित झाली. भाषांची निर्मिती ७० हजार वर्षांपुर्वी झाली असे तज्ञ म्हणतात.
आपली मराठी भाषा सुमारे २५०० वर्षांपुर्वी जन्माला आली. महारठठी, महाराष्ट्री प्राकृत आणि महाराष्ट्री अपभ्रंश, मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची तीन नावं आहेत असं राजारामशास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर, पांगारकर व पु.ग.सहस्त्रबुद्धे यांनी सिद्ध केले आहे.महाराष्ट्री प्राकृत ही संस्कृतच्याही आधीची भाषा आहे.
कलकत्त्याजवळ श्रीरामपुरला १८०६ साली पहिले मराठी पुस्तक ” ग्रामर अॅफ मराठा लॅंग्वेज” हे छापले गेले. तेव्हापासून मुद्रण कलेने मराठी भाषा आणि देवनागरी लिपी टिकण्याची प्रक्रिया गतिमान झाली.१९०७ साली भारतीय भाषांचे सर्व्हेक्षण ब्रिटीश सरकारने ग्रियरसनद्वारा केले. शतकानंतर डॉ. गणेश देवी व अरुण जाखडे यांनी पुढचे काम हाती घेतले. त्याला टाटा ट्रस्टने आर्थिक मदत केली.
स्थलांतर, जागतिकीकरण, मराठी भाषकांची उदासिनता आणि पराभूत मानसिकता, जागतिक व भारतीय बाजाराचा मराठीकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टीकोन, हिंदी- इंग्रजीचे आक्रमण, परधार्जिणे सर्वपक्षीय राजकारणी, केवळ आर्थिक संपन्नतेसाठी आणि दिखाऊ प्रतिष्ठेसाठी इंग्रजीला शरण जाण्यासाठी उत्सुक उच्च मध्यमवर्ग आणि बुद्धीजिवी, नवे तंत्रज्ञान अशा अनेक कारणांनी मराठीवरचे आक्रमण सतत वाढते आहे. अशा स्थितीत मराठी मरणार असे गेली १०० वर्षे बोलले व लिहिले जातेय.
मराठी जगेल की मरेल ते मराठी शाळा टिकणार की बंद होणार यावर अवलंबून आहे. मराठी शाळा बंद पडताहेत हे खरे आहे.जी भाषा रोजगार देते ती जगते. मराठीची रोजगार क्षमता कशी वाढवायची यावर पुढची १० वर्षे अहोरात्र काम करावे लागेल.
ज्या दिवशी मध्यमवर्गाने आणि उच्च मध्यमवर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला. पण कोणावरही मातृभाषेची बळजबरी करता येणार नाही. आजचा सर्व राजकारणी वर्ग, व्यापारी, उद्योगपती, संपादक, लेखक, प्रशासक वर्ग (थोडक्यात सगळा ओपिनियन मेकर वर्ग) आपल्या पुढच्या पिढ्यांना इंग्रजी माध्यमात शिकवीत असताना मजूर, मोलकरणी, रिक्षावाले, हमाल यांना कोणत्या तोंडाने सांगणार मराठी शाळेत मुलांना घाला म्हणून?
जे धोरण ठरवणार तेच इंग्रजीचा आग्रह धरणारे असल्याने मराठीचा आग्रह हे भर चौकातील अरण्यरुदन ठरते. मराठी बुद्धिजीवी असल्या पोस्ट वाचतही नाहीत. गेली १० वर्षे आम्ही अभिजात मराठीचा लढा एकाकीपणे लढवित आहोत. मातृभाषाद्रोही बुद्धिजवी मराठी माणूस त्याच्याकडे तुच्छतेने बघतो. विद्यापीठांचे मराठी विभाग, मराठीचे प्राध्यापक, शिक्षक, मराठी पत्रकार, संपादक, मराठी वाहिन्या तोंडदेखलासुद्धा पाठींबा देत नाहीत. (अपवाद आहेत..असतात)
आज जगात सुमारे ६ हजार भाषा असाव्यात. त्यातल्या दोन हजार मरू घातल्यात. त्यातल्या सगळ्या मेल्या आणि अवघ्या ४ भाषा टिकल्या तरी मराठी टिकेल.
आज संत एकनाथ असते तर ते सात्विक संतापाने म्हणाले असते, ” आंग्लवाणी बाजारे केली मग मराठी काय चोरांपासून झाली?”
सर्व मराठी प्रेमींना, मराठी वाचकांना, मराठी माध्यमात शिकणारांना मातृभाषा दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
ज्यांच्या आजी – आजोबांची मातृभाषा मराठीच होती, पण ज्यांचे पालक आणि जे स्वत: इंग्रजी माध्यामातून शिकलेत आणि तरिही ज्यांना मराठीचे प्रेम आहे, त्यांनी मुलांना, नातवंडांना घरच्या घरी मराठी शिकवली आहे, तिचे प्रेम निर्माण केले आहे त्या सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
आंग्लाळलेल्या ज्यांना इंग्रजीच्या गुलामीचा विशेष अभिमान वाटतो, मराठीची अतिव लाज वाटते, ज्यांना मराठी ही हलकी भाषा आहे, ती ज्ञानभाषा आणि रोजगार देणारी भाषा नाही असे वाटते, त्या “कुर्हाडीचा दांडा गोतास काळ” असणारांनाही शुभेच्छा.
इतर सर्व भाषाप्रेमींनाही जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)