प्रा. हरी नरके
४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी भटके यांचे पंचायत राज्यातील आरक्षण रद्द केले होते. सदर निकाल राज्य घटनेच्या कलम १४२ खाली दिलेला असल्याने तो भारतातील सर्व राज्ये व केंद्र शाषीत प्रदेश यांना लागू होता. त्यानुसार देशातील सुमारे ११ लाख ओबीसी लोकप्रतिनिधींचे नुकसान झाले होते. त्याविरुद्ध मी सकाळ व इतर वर्तमान पत्रांमध्ये लेख लिहिले. विविध वाहिन्यांवरून या अन्यायाला वाचा फोडली. त्यावर वकील असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की फक्त महाराष्ट्रातील आरक्षण गेले आहे. कारण ठाकरे सरकार दळभद्री आहे. आशिष शेलार यांनीही अशीच मुक्ताफळे उधळली. संपूर्ण देशातील आरक्षण गेले आहे या माझ्या म्हणण्यावर कोणताही राजकीय नेता विश्वास ठेवायला तयार नव्हता. आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनाही मला हे पटवून देताना खूप कष्ट घ्यावे लागले.
महाराष्ट्र राज्याच्या पाठोपाठ मध्यप्रदेश, गुजरात व आता उत्तरप्रदेशचे ओबीसी आरक्षण गेल्याचे दिसून आले. हळूहळू सगळीच राज्ये हे आरक्षण घालवून बसणार आहेत. भाजपाची सरकारे असणाऱ्या या राज्यांनी वेळीच आयोग नेमून इंपिरिकल डेटा जमवला असता तर ही वेळ मध्य प्रदेश, गुजरात वा उत्तर प्रदेशात आली नसती.
तिथल्या विरोधी पक्षनेत्यांना मी वेळीच सूचना देऊनही ते बेसावध राहिले. आता अखिलेश यादव, मायावती बोलू लागलेत. पण गेली पावणे दोन वर्षे तेही झोपले होते.
लोकांच्या अधिकाराचे, हक्कांचे संरक्षण करण्याचे काम राजकीय पक्षांचे आहे. त्यासाठीच त्यांना सत्ताधारी वा विरोधी पक्ष म्हणून जनता निवडून देते. पण बहुतेक राजकीय पक्ष याबाबतीत उदासीन असतात. कारण त्यांना माहित असते की ओबीसी भटके मतदार गाढ झोपेत आहेत.
आमच्यासारखे जे मोजके लोक यावर बोलतात, लिहितात त्यांना ना ओबीसी भटक्यांची साथ मिळते ना राजकीय पक्षांची. मात्र आम्हाला ज्यांच्यावर टीका करावी लागते ते भाजपवाले डूख धरून असतात. वैरी समजून गरळ ओकत राहतात. शत्रुत्व धरतात.
बौद्धिक क्षेत्रात मक्तेदारी असलेले लोक या कामाकडे तुच्छतेने बघतात. त्याला अदखलपात्र मानतात.
ज्यांच्यासाठी लढायचे तेही संपूर्ण उदासीन आणि स्थितप्रज्ञ!
आयुष्यभर असले thankless उद्योग करीत राहणे हेच आमचे प्राक्तन! :
प्रा. हरी नरके
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)