प्रा. हरी नरके
आमदार गोपीचंद पडळकर हे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. ते राष्ट्रीय समाज पक्षात असताना मानदेशातील राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात आमची भेट व ओळख झाली. त्या कार्यक्रमाला ऋषितुल्य राजकीय नेते आ. गणपतराव देशमुखही उपस्थित होते.
पुढे पडळकर व्हाया वंचित बहुजन आघाडी भाजपमध्ये गेले. त्यांना विधानपरिषद मिळाली.
मित्रवर्य संजय सोनवणी हे सिद्धहस्त लेखक असून त्यांचे होळकर घराण्याच्या इतिहासावर भरपूर काम आहे. त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पडळकर पुन्हा भेटले. अनेक अडचणींमधून हे पुस्तक प्रकाशित केल्याचे बघून पडळकर यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाचा खर्च आपण देणगी म्हणून देत असल्याची उस्फुर्त घोषणा केली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाड केला. पुढे १ वर्ष उलटून गेले पण प्रकाशकांना पडळकर यांच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही.
या घोषणेचा आणखी एक तोटा असा झाला की काही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहादहा प्रती खरेदी करून राज्यात व बाहेर अगदी विदेशातही हे पुस्तक पाठवण्याचे ठरवले होते.त्यांना वाटले काम झाले.आमदार पडळकर यांनी आर्थिक भार उचलला आता आपण प्रती नाही घेतल्या तरी चालतील.
पडळकर पैसे देणार म्हणून प्रकाशकांनी ऑनलाईन वर फ्री डाऊनलोड साठी पुस्तक उपलब्ध करून दिले.देशविदेशातील ६५ हजार ग्रंथ प्रेमींनी ते डाऊनलोड करून घेतले.
पण प्रकाशक कर्जातच राहिला
मध्यंतरी एका वाहिनीच्या कार्यालयात पडळकर यांची अचानक भेट झाली. मी त्यांना या पुस्तकाच्या देणगीची आठवण करून दिली. आठवड्यात नक्की पूर्तता करतो असे ते म्हणाले. यालाही आता सहा महिने झाले. प्रकाशक आजही कर्जातच आहे.
आणखीही इतर बोलबच्चन…
यावरून दुसऱ्या एका बोलबच्चन नेत्यांची आठवण झाली. अशाच एका पुस्तक प्रकाशनाच्या आधी आपण त्याच्या ५००० प्रती आगाऊ नोंदणी करून खरेदी करू असे ते लेखक, प्रकाशकांना म्हणाले. प्रत्यक्ष कार्यक्रमात सभाृहाबाहेर पुस्तक विक्री चालू असताना त्याची एकही प्रत त्यांनी विकत घेतली नाही. उलट तेच लेखकाकडे भेट प्रत मागायला आले. तेव्हा मी त्यांना ५ हजार प्रती घेण्याचे काय झाले असे विचारले, तेव्हा ते म्हणाले, ” उद्यापरवा घेतो.” तो उद्यापरवा नंतर कधी उगवलाच नाही.
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)