प्रा. शुद्धोधन कांबळे / व्हा अभिव्यक्त!
नेटफ्लीक्सवर “हुडदंग” हा मंडल आयोग आणि आरक्षण यावर भाष्य करणारा एक सिनेमा उपाय आहे. या सिनेमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या कोटेशनने होते, पण शेवट जातीय आरक्षणापेक्षा आर्थिक आरक्षण योग्य आहे, अशा निष्कर्षाने होतो. या चित्रपटात मंडल आयोगाच्या काळात झालेले विद्यार्थी आंदोलन आणि त्यावरील राजकीय पोळी भाजण्याचा स्वार्थी राजकीय लोकांचा प्रयत्न हे खूप छान पध्दतीने दाखविण्यात आले आहे. सबथीममध्ये प्रेम कहानीपण आहेच, सोबतच आरक्षणाविषयी वेगळे मत असणारा सहनायक आहे, जो जाती विषयक टीका टिप्पणीच्या विरोधात आहेच सोबत आर्थिक आरक्षणाचे समर्थन करतो. हा सहनायक आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन अभ्यास करण्यासाठी आग्रही असतो पण नायक, जो त्याचा खास दोस्त आहे तो त्याला आंदोलनात ओढतो आणि त्याचा राजकीय स्वार्थासाठी बळी जातो.
या चित्रपटात एस.सी. आणि एस. टी. आरक्षणावर थेट टिप्पणी केली जात नसली तरी दिग्दर्शक निखिल भट यांने आरक्षणविरोधी संदेश आजच्या युवकामध्ये नक्की पसरविलेला आहे. हा चित्रपट “द काश्मीर फाईल्स” सारखा propoganda movie आहे.
चित्रपटाच्या शेवटच्या दहा मिनिटांत आरक्षणाविरोधी प्रचार केला जातो. मंडल आयोगाच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्याचा संदर्भ आजच्या पिढीसोबत जोडून आरक्षण विरोधी मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय नेते विद्यार्थी आंदोलनात कसा स्वार्थ साधत , हे खूप उत्तम पध्दतीने दाखविले आहे. राजकारण आणि विद्यार्थी अशी मध्यवर्ती संकल्पना वाटत असतानाच चित्रपट दिग्दर्शकाचे वैयक्तिक मत्त प्रेक्षकांवर लादण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटात नवीन कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे, तांत्रिकदृष्ट्या पण चित्रपट उजवा आहे. दिग्दर्शकाचे कथा सांगतानाचे धक्कातंत्र प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आजकाल ओटीटीवर नवीन चित्रपट कीती जणांनी पाहिला हे मोजणे कठीण आहे पण हा चित्रपटावर जास्त चर्चा झाली नाही. या चित्रपटाकडे जरी लोकांनी पाठ फिरवली असली तरी अशा चित्रपटांची निर्मिती येणाऱ्या काळात आणखी होईल. त्यासाठी आपण (म्हणजे आरक्षणाचे समर्थन करणारे ) यांना आपल्या पातळीवर उत्तर देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. जातीय आरक्षण हे आर्थिक दुर्बलता करण्याचे साधन नसून संधीची समानता यासाठी आहे, हे ठासून सांगता आले पाहिजे. त्यांच्याकडे चित्रपट बनवून आरक्षण विरोधी भाष्य करण्याची शक्ती असली तरी आपल्याकडे ते भाष्य सबळ पुराव्यासोबत खोडण्यासाठी सोशल मीडिया आहे.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)