प्रा. हरी नरके
अनिल अवचट यांचे प्रत्येक पुस्तक वाचनीय, भवताल भेदकपणे उलगडवून दाखवणारे आणि वंचित समाजाबद्दल अपार कळवळ्याने लिहिलेले आहे. त्यांचं ‘माणसं ‘हे पुस्तक तर अत्यन्त श्रेष्ठ प्रतीचे साहित्य म्हणून सर्वकालीन मास्टरपीस ठरावे. अनिलने कितीतरी विषय हाताळले. मध्यमवर्गीय, बुद्धीवादी वाचक वर्गाचा अनिल हा महत्वाचा वाटाडया. भारतीय सामाजिक विवेकाचा अनिल हा बुलंद आवाज होता.
अनेक वर्षं तो डॉ. बाबा आढाव यांच्यासोबत काम करायचा. त्याची पत्नी डॉ. सुनंदा (अनिता) ही हमाल वर्गासाठी अनेक वर्षे विनामूल्य दवाखाना चालवायची. तिनं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पायाभरणी केली. ही संस्था त्यांची मुलगी मुक्ता हिनं जपली. वाढवली.
अनिल हा अवलिया होता. मनस्वी. धडपड्या. लिहिणं, फिरणं आणि रसरसीत जगणं यात तो रमायचा. त्यानं आपलं आत्मचरित्र अनेक पुस्तकांमधून लिहिलं. मी त्याच्या ताज्या स्वकथनपर पुस्तकावर अनिलचं आत्मचरित्र खंड ७३वा असं लिहिलं तर अनिलनं त्यालाही लाईक केलेलं.अलीकडच्या काळात त्याची विविध छंदांवरची बरीच पुस्तकं आली. त्यांच्यामध्ये मात्र फारसा दम नव्हता.
सुनंदाचं अकाली जाणं अनिलला जिव्हारी लागलं. तो माझ्यापेक्षा वयानं आणि अनेक बाबतीत मोठा असला तरी मी त्याला अरेतुरे करावं असा त्याचा आदेश. आम्ही नामांतर आंदोलनात ठाणे जेलमध्ये एकाच बराकीत होतो. तेव्हा २४ तास एकत्र असायचो. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवे. अनिलची दृष्टी चौफेर होती. त्याला शेकडो छंद होते. त्यामुळे तो कायम व्यग्र असायचा. त्याचेही काही विकपॉइंट होते. प्रत्येकाला असतात.
अनिलने माझ्या पिढीची सामाजिक दृष्टी विस्तारली. निवळ केली. ओतूरसारख्या खेड्यातून आलेल्या अनिलने सामाजिक दस्तऐवज या लेखनप्रकारात फार मोठी भर घातली. घरातला टिपिकल मध्यमवर्गीय वारसा नाकारून अनिल वंचितांमध्ये रमला. त्यांचा झाला. त्याचे रिपोर्ताज ह्या वाड्मय प्रकारातले लेखन अनेक पिढयांचे डोळे उघडण्याचे काम करील. श्री. म. माटे, साने गुरुजी यांचा वारसा अनिलने जपला, मोठा केला.
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)