मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निकालांनंतर काँग्रेस पक्षांतर्गत वाद शमवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या महिन्यात कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या तीन बैठका पार पडल्या, यामध्ये पक्षाने एकसंघ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एवढचं नव्हे तर कॉँग्रेसमधील नाराज नेते गुलाम नबी आझाद हेही आता पक्ष कार्यात पूर्वीसारखे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तर २०२२ च्या निवडणुका होईपर्यंत पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधीकडेच असणार आहेत.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांना पक्षातील असंतुष्ट नेत्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात पूर्वी सारखे सक्रिय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी या कामाला फेब्रुवारीपासून सुरूवात केली असून दोन महिन्यांतच त्यांना नेत्यांना एकत्र करण्यात यश मिळाले आहे. जेव्हा पक्षाने कोरोना टास्कफोर्सची स्थापना केली तेव्हा प्रियंका वाड्रा यांच्यासह पहिले नाव जम्मू-काश्मीरचे नेते गुलाम नबी आझाद यांचे होते. त्यात असंतुष्ट मानले जाणारे ‘जी -२३’ चे मुकुल वासनिक यांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात मनीष तिवारी यांचा समावेश आहे. इतर असंतुष्ट नेत्यांचीही समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणारे ‘जी -२३’चे ज्येष्ठ सदस्य विवेक तंखा यांचे कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहीर कौतुक केले.
पक्षाचे युवा नेते बी.व्ही. श्रीनिवास यांचाही कोरोना टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आले आहे. आगामी तीन राज्यांच्या निवडणुकांसंदर्भात अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्ये शशी थरूर, कपिल सिब्बल या ज्येष्ठ नेत्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात.
२०२२पर्यंत सेनियांकडेच नेतृत्व, प्रियंकांची सक्रियता वाढली
- प्रियंका गांधीनी स्वत:ला उत्तर प्रदेशापुरते मर्यादित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
- गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आसाम आणि केरळपर्यंत प्रचार केला होता.
- उत्तर प्रदेशात त्यांची पूर्वेकडील प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- यूपीच्या पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण राज्याची जबाबदारी प्रियांकाच्या खांद्यावर आहे.
- २०२२ च्या उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी पूर्णवेळ अध्यक्षपदाच्या भूमिकेत राहतील, असे पक्षात जवळजवळ एकमत झाले आहे.
- १० मेची कॉंग्रेसची बैठक पुढे ढकलण्यात आली.
- या बैठकीत राहुल गांधी उपस्थित नव्हते.
- राज्यसभेचे माजी टीव्ही प्रमुख गुरदीपसिंग सप्पल प्रियांका गांधी यांना पक्षाच्या नेत्यांना एकत्र करण्याच्या मोहिमेमध्ये मदत करत आहेत.
- त्यांनाही कोरोना टास्कफोर्समध्ये प्रियंका गांधींनी स्थान दिले आहे.
आझाद यांना राज्यसभेत पाठविण्यास मान्यता
- पक्षाध्यक्षांनी प्रियंका वड्रा यांना नाराज नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी दिली आहे.
- गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेत पाठविण्याचे मान्य केल्याचे कळते.
- अन्य असंतुष्टांपैकी कपिल सिब्बल, शशि थरुर, भूपिंदर सिंह हुडा यांनाही महत्वाच्या भूमिका सोपवण्याची तयारी सुरु आहे.