मुक्तपीठ टीम
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात धोका मांडला, “कोरोनाची पुन्हा उसळलेली लाट त्वरित थांबवावी लागेल. कोरोना गावात पोहचला, तर रोखणे कठिण जाईल. आपल्या जुन्या प्रयत्नांबरोबरच आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. अनेक राज्य अन्य राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे”.
मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील नव्या लढ्यासाठी पंचसुत्री मांडली:
मोदी सूत्र -१ : मास्क पाहिजेच!
पंतप्रधान म्हणाले की, “मास्कबाबत अजून गांभीर्य आवश्यक आहे. प्रशासकीय स्तरावर मास्कबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. आपले यश निष्काळजीपणामध्ये बदलू नका.
मोदी सूत्र -२ : गावात कोरोना नको!
मोदी पुढे म्हणाले की, “या वेळी ज्या शहरांमध्ये कोरोना पोहचला नव्हता, तेथेही रुग्ण आढळत आहेत. याआधी आपण कोरोनाची लढाई जिंकू शकलो, कारण कोरोना गावात पोहचला नव्हता. पण आता गावातही कोरोना पोहचला तर महामारीला थांबविणे कठीण होईल.”
मोदी सू्त्र -३ : लस वाया नको!
आंध्र प्रदेश आणि यूपीसारख्या राज्यात कोरोना लस वाया घालवली जात आहे ही चिंतेची बाब आहे. जेवढ्या लवकर लसीला वाया घालवणे रोखले जाईल, त्यावेळी पहिला आणि दुसरा डोस शक्य तितक्या लवकर उपलब्ध होईल. लस वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी”, असे मोदी म्हणाले.
मोदी सूत्र – ४ : आरटी-पीसीआर चाचणी वाढवा
आरटी पीसीआर चाचणीचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवणे आवश्यक आहे. बर्याच राज्यात, रॅपिड अँटीजन टेस्टवर जोर देण्यात येत आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवतानाच लसीकरणाची केंद्रे वाढवण्याची आवश्यकता मांडली. खाजगी असो वा सरकारी लसीकरण केंद्र असणे गरजेचे आहे.
मोदी सूत्र -५ : मायक्रो कंटेनमेंट झोन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यावर जोर दिला पाहिजे. जनतेच्या जागरुकता आणि सहकार्यामुळे भारताला विजय मिळाला आहे.