मुक्तपीठ टीम
भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रथमच या परिसंवादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिली.
नाशिक येथे दिनांक २ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यामध्ये मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. आता भारत निवडणूक आयोगाने हा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ५ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आला असल्याने या कार्यक्रमांसंदर्भातील माहिती देण्यासाठी मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही रसरशीत राहावी, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक असतो, लेखक आणि त्याची लेखणी. लेखकाची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा.कौतिकराव ठाले पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण व दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार करणार आहेत. सदर परिसंवाद Chief Electoral Officer या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरूनही पाहता येणार असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले.