मुक्तपीठ टीम
आपल्या देशातील पानीपतच्या विंकाने बॉक्सिंग स्पर्धेत अभिमानास्पद यश मिळवले आहे. फेब्रुवारी महिन्यात माँटेनेग्रो येथे झालेल्या ३० व्या एड्रिएटिक पर्ल टूर्नामेन्टमध्ये भारतीय महिला बॉक्सर विंका धर्मेंद्र प्रधानने ६० किलो वजनाच्या गटात देशासाठी सुवर्णपदक जिंकले. तिला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणूनही निवडले गेले. तिची यशोगाथा ही सोपी नाही तर प्रेरणादायी परिश्रमाची आहे.
एका सामान्य रिक्षाचालकाची कन्या असणाऱ्या विंकाने परिश्रमाने हे यश मिळवले. तिला चेहरा खराब होईल असे टोमणे मारणाऱ्यांना तिने जागतिक यशातून उत्तर दिले.
विंकाचे देशासाठी पदक जिंकण्याचे मोठे स्वप्न होते. तिने याची सुरूवात हॉकीपासून केली, पण नंतर बॉक्सिंगकडे वळली. विंका सध्या रोहतकमधील खेलो इंडिया सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आता पोलंडमध्ये १० ते २४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या एआयबीए यूथ वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे लक्ष्य आहे.
आर्य बालिका शाळेमध्ये विंकाला स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळाला. तिने हॉकीपासून सुरुवात केली. दुसऱ्यांच्या चुकीमुळे काहीवेळेस पराभवाला सामोरे जावे लागते, परंतु वैयक्तिक खेळांत तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळते. म्हणून तिने वैयक्तिक खेळाकडे जाण्याचे ठरविले. त्यातूनच तिने बॉक्सिंगची निवड केली.
विंकाला खेळण्यासाठी घरून विरोध नव्हता. पण बाहेरची लोक टोमणे मारत असत. बॉक्सिंगमध्ये नाक खराब झाले तर लग्न कसे होणार? असे घाबरवले जात असे. पण विंकाने लक्ष दिले नाही. वडिलांनीही प्रोत्साहनच दिले. जेव्हा तिने बॉक्सिंग खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वडीलच तिला पानिपतच्या क्रीडा स्टेडियममध्ये घेऊन गेले.
विंकाला आणखी दोन भावंडे आहोत. वडिल ऑटो रिक्षा चालक आहेत. आई गृहिणी होती. वडिलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असूनही तीन भावंडांपैकी कोणालाही कधीही काहीही कमी पडू दिले नाही. २०१८ मध्ये खेलो इंडियामध्ये जिंकल्यानंतर विंकाची निवड ‘खेलो इंडिया’त सहभागीसाठी झाली. तेव्हापासून ती रोहतकमधील स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व बॉक्सरला केंद्रातून घरी पाठविण्यात आले. विंका तिच्या गावात राहून सराव करायची. केंद्राचे प्रशिक्षक व्हॉट्सअॅपवर संपर्कात होते. ते जे वेळापत्रकानुसार सराव द्यायचे तोच मी विंका करीत असे.
आता तिचे लक्ष्य हे पोलंडमध्ये १० ते २१ एप्रिल दरम्यान होणाऱ्या एआयबीए यूथ वर्ल्ड कपमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे आहे. ती ते पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम घेत आहे. तिच्या दृढ निश्चयाची प्रचिती आता ती जिंकली तेव्हाही आली. जागतिक स्पर्धेआधी एका शालेय स्पर्धेत प्रतिस्पर्धी बॉक्सरने तिच्या नाकावर डोके मारले होते. नाकाची शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. पण विंकाने नम्रपणे आराम नाकारला. कठोर परिश्रम घेतले. ती जिंकली. आताही तिचा निश्चय तोच आहे. वडिलांना अभिमान वाटेल असं जिंकायचं. देशाचं नाव मोठं करायचं!