प्रवीण गायकवाड
माळशिरस तालुक्यातील गारवाड (अकलूज) गावाच्या ठिकाणी सुळकाई देवीचं मंदिर आहे. तेथे सहज एके दिवशी दुपारच्या १२/१ वाजता ट्रेकला गेलो होतो. तेथील तापमान ४०/४२ डिग्री असेल. त्यावेळी ग्रामीण भागातील या स्त्रीया जळण म्हणजेच सरपण गोळा करत होत्या. त्यांच्या घरापासून डोंगराळ भागात कमीतकमी ५/६ किलोमीटर विंचूकाट्याच्या रस्त्याने लांब चालत आल्या असतील. मी त्यांच्याकडे बारीक नजरेने पाहत होतो. तेव्हाच माझ्या मनात असंख्य विचार घोळू लागले.
मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांची नावं विचारली. पण त्यांनी नावं सांगण्यास नकार दिला व बोलायला घाबरल्या. कारण, त्यांना मी कोण आहे हा प्रश्न पडला. वन अधिकारी आहे की शेताचा मालक आहे. नक्की हा अनोळखी माणूस कोण आहे असा हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु, त्यांनी त्यांची नावं नाही सांगितली याचं मला आश्चर्य वाटलंच नाही. त्यांनी नावं जरी सांगितली असती तरी त्यांना समाजाने कुठं ओळख दिली असती. अर्थात, नावात काय आहे. पुढे लगेचच जळण डोक्यावर घेतलं अन् लगबगीने चालू लागल्या. थोडीशी भीती, थोडीशी गडबड दिसत होती.
मला मात्र खूप हळहळ वाटली. हे चित्र पाहून मनात प्रश्न पडला की, अशा परिस्थितीत ‘उज्वला गॅस’चे काय झालं? पूर्वी रेशनवर मिळणारे रॉकेल तरी कुठं मिळतंय? पोटाची खळगी भरण्यासाठी विंचूकाट्यात गोळा केलं जाणारं हे जळण… शेतात राबणं… थोडे बहुत पैसे कमवणं… त्यातून गुजारा करणं. जगण्यासाठी काम अन् कामासाठी जगणं एवढंच काय ते त्यांचं आयुष्य. अन्न शिजवण्यासाठी, पेटवलेली चूल कधी छाती धुराने भरुन टाकते कळतच नाही. दुर्दैवाने पुढे फुफुसाचे आजार किंवा कॅन्सरला बळी पडावं लागतं.
आपल्या देशाला ७५ वर्ष पूर्ण होताहेत. त्यातच आपण आजादी का अमृतमहोत्सव साजरा करतोय. परंतु,या देशाचे हे चित्र कधी बदलेल? वास्तविक पाहता श्रीमंत व गरीबीत प्रचंड मोठी दरी असून किती फरक आहे. आपल्याकडे सर्व असतं तरीही आपण तक्रार करत बसतो. मात्र, ते कुठलीही तक्रार न करता आनंदाने जगत असतात. त्यांच्या जगण्याची लढाई कठीण जरी असली तरी ते कायम निखळ हसतात. शेवटी एवढंच म्हणेल की खरंच, भारत आणि इंडिया फार वेगळा आहे…!