मुक्तपीठ टीम
शिवसैनिकांनी युती व आघाडीची चिंता करु नये. तुम्ही कामाला लागा… हा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेला संदेश म्हणजे आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल की नाही याचीच शंका उध्दव ठाकरे यांना बहुधा आली असावी, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुखांचा संदेश म्हणजे अलीकडच्या काळातील तिन्ही पक्षांच्या सरकारमधील विसंवाद असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगताना देरकर म्हणाले की, युती व आघाडीबद्दल वेगवेगळया राजकीय समीकरणाचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना प्रेरणा व चेतना देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुखांना पर्याय नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांनी जनतेसाठी काम करा,विकास कामे करा असा संदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. पण आमदारांना विकास कामासाठी शासनाकडून निधी द्यावा लागतो. पण दुर्दैवाने अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे आज शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक नाराज आहेत. त्यांना योग्य विकास निधी दिला जातं नाही, त्यामुळे विकास कामे ठप्प आहेत असे स्पष्ट करतानाच देरकर म्हणाले की, युती की आघाडी करायची हा निर्णय मुख्यमंत्रीचं घेऊ शकतात. मुख्यमंत्री युतीही करू शकतात अणि आघाडीसुद्धा करू शकतात, त्यामुळे या दोघांपैकीचं एक निर्णय होऊ शकतो. किंवा तिसरा निर्णय निवडणुकीला सामोरे जायचा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काय होईल, युतीचं काय होईल, उद्या अचानक निवडणुका लागल्यास त्यांना सामोरे कसं जायचं त्यामुळे उद्याच्या परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेत शिवसैनिकांना ताकदीनं उभं करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी आज हा संदेश दिला असावा असेही त्यांनी स्पष्ट केले.