मुक्तपीठ टीम
किरीट सोमय्या यांच्यावर यापूर्वीही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्याच्या पोलिसांना माहीत नव्हते का, एवढे शिवसैनिक आजूबाजूला जमा होत आहेत. इंटेलिजन्स काय करत होते? की जाणीवपूर्वक सरकारच्या दबावाने पोलिसांनी दुर्लक्ष केले? याचेही उत्तर सरकारने द्यावे. सोमय्या माजी खासदार आहेत. सोमय्या यांच्यावरील प्राणघातक हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
पुणे महापालिका बंद असताना सोमय्या त्या ठिकाणी गेले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला, असे बोलले जातेय त्यावर दरेकर म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे आहे. पोलिसांचे आहे. किरीट सोमय्या यांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मारहाण करणे, हे कोणत्या कायद्यात बसते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होणे हे कायदा सुव्यवस्था राखण्याचे लक्षण आहे की बिघडवण्याचे लक्षण आहे.
भाजपाचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी तशाच संख्येने आले असते आणि जर हाणामाऱ्या झाल्या असत्या तर कायदा सुव्यवस्था राखली गेली असती का? यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून या प्रकरणाची दखल घेऊन यातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.