मुक्तपीठ टीम
राज्यपाल आणि पंतप्रधानांवर रोज उठून अर्थहीन बोलणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मानसिकतेची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. १२ विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फाईलबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेच्या संजय राऊतांनी तिरकस टीका केली आहे. यावर दरेकर माध्यमांशी बोलत होते.
प्रविण दरेकर म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे घटनात्त्मक प्रमुख आहेत, ते काही कुणा पक्षाचे कार्यकर्ते नाहीत किंवा नेतेही नाहीत, मंत्र्यांना शपथ देण्याचे काम राज्यपाल करीत असतात. सरकारकडे निर्णय घेण्याचे व अमलबजावणीचे अधिकार असतात. त्यामुळे पाठपुरावा करण्याची अपेक्षा राज्यपाल महोदयांकडून करणं उचित नाही. तसेच विधान परिषदेवर नामनियुक्त करण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्टआहे, तो पर्यंत धीर धरण्याची आवश्यकता आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना कोणती नावं पाठवली, याची यादी सरकारकडे असेलच, ती सरकारने जाहीर करावी. हे सरकार ते कदापिही करणार नाही. कारण, १२ विधान परिषद जागा असल्या तरी ५० नेत्यांना आमदार करतो, असं गाजर या सरकारने दाखवलेलं आहे. ही नाव समोर आली तर तिन्ही पक्षात वेगळ्या प्रतिक्रिया उमटतील, याची चिंता या सरकारला आहे. किंबहुना, सरकारने नावं पाठवली की नाही, याबद्दलचं शंका निर्माण होत आहे, अशी एक वेगळी बाजू दरेकर यांनी समोर आणली आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्या ऐवजी सरकारला १२ आमदारांची काळजी जास्त
दहावी, बारावीची परीक्षा असो की शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विषय असो, सरकारला वेळोवेळी निर्णय मागे घ्यावे लागले आहे किंवा त्यात बदल करावा लागला आहे. यावर दरेकर म्हणाले की, राज्यात २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून राज्याचा शिक्षण विभाग योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरतो आहे. उलट यांच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, अशी ५ कोटीच्या आसपास जनता चिंताग्रस्त आहे. परंतु, या सरकारला या ५ कोटी जनतेविषयी कळकळ नाही तर त्यांना १२ आमदारांची काळजी लागली आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
संजय राऊत यांचा सरकारवर विश्वास राहीला नाही
तौक्ते चक्रीवादळाची मदत आणि लसी यासाठी राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. यावर दरेकर म्हणाले, मराठा आरक्षणाविषयी असो किंवा इतर बाबी असतील, राज्यातलं सरकार राज्यपालांना पत्र देतं आणि केंद्राने निर्णय घ्यावा, अशी कार्यपद्धतीला सोडून कृती करीत आहे. वास्तविक पाहता, नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव राज्यसरकारकडून केंद्राला पाठवला जातो, मधल्या काळात राज्य तातडीची मदत जाहीर करते. कदाचित, ही कार्यवाही करील, हा विश्वास संजय राऊतांना आपल्या सरकारवर राहिला नसल्यामुळे त्यांनी राज्यपाल महोदयांचा दरवाजा खटखटवला असावा, अशी टीका करताना राज्यपालांनीच जर लसीसाठी पाठपुरावा करायचा असेल तर मग राज्यसरकार काय करत आहे, त्यांच्यात क्षमता, कुवत नाही का, असा प्रतिप्रश्नच राऊतांना विचारला आहे.
राज्यसरकारने भाजपची काळजी न करता स्वपक्षाची काळजी घ्यावी
प्राणवायू संपून भाजपावर गुदमरायची वेळ येईल, अशी बोचरी टीका राऊत यांनी भाजपावर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, भाजपाकडे जनतारूपी प्राणवायू खूप आहे, देशात आणि राज्यात भाजपला सतत जनाधार मिळत आहे, अलीकडच्या काळातील पंढरपूरातील पांडुरंगाच्या भूमितून मिळालेला प्राणवायू हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे राऊत साहेबांनी भाजपची काळजी करण्यापेक्षा स्वपक्षाची काळजी घ्यावी, असा सल्ला दरेकर यांनी दिला.
दरेकर म्हणाले, मी कधीकाळी शिवसेनेतून आलेलो आहे, बाळासाहेबांच्या सामाजिक बांधीलकीचा, हिंदुत्वाच्या विचारांचा प्रभाव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अजूनही आहे. सामाजिक बांधिलकी हा शिवसेनेचा प्राणवायू होता, शिवसेनेसाठी हिंदुत्व हाच आत्मा होता. परंतु ती सामाजिक बांधिलकी आता सेनेमध्ये आहे का? तो प्राणवायू कुठे गेला? गेल्या वर्षी निसर्ग वादळ आलं, शिवसेना कुठेही दिसली नाही, कोकणात कोरोनाचा प्रभाव वाढत होता, शिवसेना उपाययोजनासाठी आग्रही।दिसली नाही, आता तौकते वादळ झालं, भाजपने सामाजिक बंधीलकीतून नुकसानग्रस्तासाठी कपडे, कौले, पत्रे पाठवली, अजूनही पाठवली जात आहेत. अशी बांधिलकी, आधार सेनेतून लोप पावला आहे. त्यामुळे या सामाजिक बांधिलकीचा सेनेचा प्राणवायू कुठे गेला, शिवसेनेसाठी आता सत्ता हाच प्राणवायू आहे का, असे प्रश्न दरेकरांनी उपस्थित केले.
सरकारवर दबाव आणल्याशिवाय जाग येणार नाही
तौक्ते वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी ३ तास दौरा केला, आता त्याला दोन दिवस झाले. बहुतांश पंचनामे सरकारकडे आले आहेत, पण अजून सरकारने मदत जाहीर केलेली नाही. येत्या दोन दिवसात सरकारकडून मदत जाहीर झाली नाही तर सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि कोकणवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा दरेकर यांनी सरकारला दिला आहे. दरेकर म्हणाले, कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व पद दिली, शिवसेनेला मिळालेली सत्ता आणि आलेले वैभवाचे दिवस केवळ कोकणवासीयांमुळे आले असले तरी या सव्वा वर्षाच्या काळात कोकणवासीयांसाठी एकही चांगले पॅकेज या सरकारने दिले नाही. तत्काळ कोकणवासीयांना मदत द्या, पंचनामे झाले नसतील तर नजर अंदाजाने दोन दिवसात तातडीची मदत जाहीर करा, अशा मागण्याही दरेकर यांनी केल्या आहेत.
मविआ मधील नेत्यांची बोलाची कडी आणि बोलाचा भात
काही दिवसांपूर्वी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. काल कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाणार प्रकल्प हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, मविआ मधील मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. जनतेला भुलथापा देण्याचं काम केलं जातं आहे. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे स्वतःच अस्तित्वही टिकवायचं आहे, अशी तारांबळ मविआ मधील मंत्र्यांमध्ये दिसून येत झाहे.