मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात उद्या कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत.
छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. “उद्या १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत”,अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विट करून दिली आहे. कोल्हापुरात निघणारा हा पहिला मराठा आरक्षण मोर्चा ठरणार आहे.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय दिला. देशात सर्वात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. बाबासाहेबांना सर्वार्थाने मदत केली ती शाहू महाराजांनी आणि डॉ बाबासाहेब आंबेडरांनी नेहमी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा गौरव केला आहे.
अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात हा सामाजिक समतेचा आणि एकोपयाचा संदेश जाईल.