मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटकप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एन्काउंटवर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून तपासणी सुरु केली. या तपासणीदरम्यान प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी लोणावळ्यातील एका रिसार्टमधून शर्मा यांना ताब्यात घेऊन एनआयए कार्यालयात नेण्यात आले. दुपारी प्रदीप शर्मा यांना अधिकृत अटक करण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटकप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून प्रदिप शर्मांकडे बोट दाखवण्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर अचानक वाझेंनी एनआयएच्या आरोपांना दुजोरा देणारी जबानी दिली. त्यात त्यांनी स्फोटकांच्या काड्या मिळवण्यासाठी शर्मांची मदत झाल्याची कबुली दिली, असे कळते. त्यानंतरच्या तपासात एनआयएने प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आणखी माहिती मिळाल्यानंतर अखेर शर्मांना अटक करण्यात आली आहे. याआधीही एनआयएने शर्मांची चौकशी केली होती.
प्रदिप शर्मा…एनकाऊंटर स्पेशलिस्ट ते नेता ते आरोपी!
प्रदिप शर्मा – एनकाऊंटर स्पेशलिस्ट
• प्रदीप शर्मा १९८३च्या एमपीएससी बॅचचे पोलीस अधिकारी आहेत.
• या बॅचच्या अधिकाऱ्यांना दोन दशके मुंबईवर राज्य केले.
• मुंबईतील माफियांना संपवण्यातही या बॅचची मोठी भूमिका होती.
• त्यानंतर मात्र कायद्याबाहेरच्या सत्तेची चटक लागून बॅच बिघडत गेली.
• याच बॅचपैकी एक असणारे प्रदीप शर्मा हेही एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात.
• प्रदीप शर्मांनी ३१२ गँगस्टरचं एन्काऊटंर केले.
• २००८ मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.
• लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात २०१० मध्ये अटक झाली होती
• २०१७ मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती.
• त्यानंतर त्यांनी सेवेतून बाहेर जाऊन सामाजिक कार्यास सुरुवात केली.
प्रदिप शर्मा – समाजसेवक
• अंधेरी पूर्व परिसरातील प्रकाशवाडी-गोविंदवाडीत ते पी.एस.फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सक्रिय झाले.
• या परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये एसआरए राबवली जात असल्याने त्यांचा चांगला संपर्क होता.
• या परिसरात कार्यालय उघडून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेत उपक्रम राबवले.
• मात्र, त्यांच्या नावाच्या दबदब्याएवढे मोठे त्यांचे कार्य कधी दिसले नाही.
प्रदिप शर्मा – राजकारणी
• २०१९च्या निवडणुकीच्या दोन वर्षेआधीपासून त्यांनी राजकारणाचा विचार सुरु केला, असे मानले जाते.
• शिवसेना भाजपाचे संबंध तणावाचे असल्याने ते भाजपाच्या माध्यमातून अंधेरी पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवतील अशी चर्चा होती.
• वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे भाजपाने उमेदवारी दिली नाही, तर मित्रपक्ष आरपीआयचे ते उमेदवार असण्याचीही त्यांची तयारी होती.
• अंधेरीत भाजपाकडे सुनिल यादव, राष्ट्रवादीतून येऊन तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळचे झालेले मुरजी पटेल हे स्थानिक इच्छूक असल्यानेही त्यांना उमेदवारी मिळणे सोपं नव्हते.
• भाजपा शिवसेना युती नक्की झाल्यावर ते शिवसेनेकडे वळले.
• शिवसेनेकडे आमदार रमेश लटके यांच्यासारखा मजबूत उमेदवार असल्याने शर्मा यांची अंधेरीत डाळ शिजू शकली नाही.
प्रदिप शर्मा – राजकीय कारकीर्दीचं नालासोपाऱ्यात एनकाऊंटर
• त्यानंतर त्यांनी शोध घेऊन उत्तर भारतीय मतदारांची संख्या प्रभावशाली असलेल्या नालासोपारा मतदारसंघाची निवड केली.
• शिवसेनेला त्या पट्ट्यातील बाहुबली प्रभावी नेते हितेंद्र ठाकुरांच्या उमेदवारांशी सामना करण्यासाठी असाच उमेदवार योग्य वाटला असावा.
• त्यामुळे शर्मांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्यात सचिन वाझेंनीही संपर्काची भूमिका बजावली.
• प्रदिप शर्मांनी २०१९नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली.
• हितेंद्र ठाकुर यांचा मुलगा क्षितिज ठाकूरने त्यांना पराभूत केले.
• मधील काळात ते चर्चेत नव्हते, अंबानी निवासस्थानाबाहेरील स्फोटके प्रकरणानंतर त्यांचे नाव चर्चेत आले.
• एनआयएने त्यांची चौकशीही केली. आता अखेर अटक झाली.