मुक्तपीठ टीम
आज स्थायी समितीत भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी माहितीचा मुद्दा (Point of Information) उपस्थित करून म्युकर मायकोसिस या नवीन पोस्ट कोरोना आजाराबाबत प्रशासनाकडे माहिती मागितली.
यावेळी बोलतांना प्रभाकर शिंदे यांनी कोरोना प्रादुर्भावाने बाधित रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्यावर “म्युकर मायकोसिस” या आजाराने ग्रस्त होत आहेत असे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. पोस्ट कोरोना किंवा कोरोनाचे उपचार सुरु असतांना बुरशीजन्य आजार म्हणजे “म्युकर मायकोसिस” आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होत आहे. म्युकर मायकोसिस इंजेक्शनचे दर आणि उपचार पद्धतीचे दर महागडे आहेत असे कळते.
या पार्श्वभूमीवर आपण मुंबई शहरामध्ये आपली आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे काय? अशी विचारणा करत त्यांनी प्रशासनाकडे खालील प्रश्नांबाबत माहिती मागितली.
१) मुंबई शहरामध्ये “म्युकर मायकोसिसचे” एकूण किती रुग्ण आढळले आहेत?
२) म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती दक्षता कोरोनाच्या उपचार दरम्यान घेणे आवश्यक आहे जेणेकरून सदर आजाराची बाधा होणार नाही?
३) म्युकर मायकोसिस हा रोग संसर्गजन्य आहे काय? आणि त्याबाबत कोणती काळजी घ्यावी?
४) सदर आजार झाल्यास नक्की उपचार पद्धती काय असावी (Treatment Protocol) ?
५) म्युकर मायकोसिस या आजारावरील ‘एम्फो टेरेसीन बी’ या इंजेक्शनची उपलब्धता महानगरपालिका रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात आहे काय?
६) वरील इंजेक्शनच्या किंमतीवर FDA चे नियंत्रण आहे काय?
७) सदर आजारात नाक, कान, घसा आणि डोळ्याचे तज्ञ डॉक्टर हे रुग्णालयात उपस्थित असणे आवश्यक आहे असे समजते. हि बाब लक्षात घेता आपल्या सर्व कोरोना रुग्णालयात / जम्बो कोरोना सेंटरमध्ये असे तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत काय?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडल्याच्या सुस्कारा टाकतांना या नवीन बुरशीजन्य म्युकर मायकोसिस आजाराबाबत सविस्तर माहिती आरोग्य यंत्रणेस, जन प्रतिनिधीस आणि मुंबईकरांस मिळणे आवश्यक आहे, म्हणून आयुक्तांनी याबाबत सविस्तर लेखी निवेदन करावे अशी आग्रहाची मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली.