मुक्तपीठ टीम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि १४ डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नूतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२२ आहे तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नवीन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी, २०२२ आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरावे, असे आवाहन मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतिगृह प्रवेशासाठी काय आहेत पात्रता
मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या अधिनस्त चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा आहे. त्यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न मर्यादा रुपये २ लाख पर्यंत तर इतर जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकरिता उत्पन्नांची मर्यादा रु. १ लाखापर्यंत दिली आहे.
विद्यार्थ्याचा प्रवेश महाविद्यालयात निश्चित झालेला असावा, मागासवर्गीय विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याकरिता असलेल्या (गुणवंत विद्यार्थ्याचे वसतिगृह) वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता 55 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास असलेल्या विद्यार्थ्यांनाच वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. केवळ पदविका अभ्यासक्रमानंतर पदविकेच्या द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना वसतिगृहात द्वितीय वर्षास प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.