मुक्तपीठ टीम
लॉकडाऊनमुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र, काही शाळा किंवा कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर दरम्यान अचानक पॉर्न व्हिडिओ क्लिप सुरु झाल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातील एका खासगी शाळेच्या इयत्ता पाचवीच्या ऑनलाईन लेक्चर दरम्यान अचानक पॉर्न व्हिडिओ क्लिप सुरु झाली. या घटनेबाबत शाळेच्या प्रशासनांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लेक्चरची लिंक – पासवर्ड बाहेर दिल्यामुळे तसे घडल्याची शक्यता आहे. त्यामुळेच ऑनलाइन लेक्चर्समधील पॉर्न घुसखोरी रोखण्यासाठी नेमकं काय करायचं तेही समजून घेणे आवश्यक आहेत.
नेमकं काय घडलं?
- ‘ऑनलाईन लेक्चरची लिंक आणि पासवर्ड शाळेने विद्यार्थ्यांना शेअर केली होती.
- कोणीतरी ही लिंक बाहेरच्या एका व्यक्तीशी शेअर केली होती, ज्याने ती लॉग इन करत पॉर्न व्हिडिओ क्लिप शेअर केली, असा संशय आहे.
- इयत्ता पाचवीच्या मुलांनी त्यांच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये ऑनलाईन लेक्चरसाठी लॉग इन केले, त्यानंतर थोड्याच वेळात पॉर्न व्हिडिओ क्लिप प्ले होऊ लागली.
- काही मुले त्यांच्या पालकांसोबत होते, ज्यांना ही घटना पाहून धक्का बसला.
सायबर पोलिसांकडून तपास सुरु
- पुणेच्या खेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश गौरव यांनी संपूर्ण गुन्हा मांडला.
- जेव्हा व्हिडीओ क्लिप सुरु झाली, त्या वेळी सुमारे ३० विद्यार्थी ऑनलाइन लेक्चरला उपस्थित होते.
- या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- आता या प्रकरणाचा तपास सायबर तपास पथक करत आहे.
ऑनलाइन शिक्षणात कशी टाळाल ‘पॉर्न’ घुसखोरी? या घ्या टिप्स…
सर्वांसाठी
- सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाइन क्लासेसचा पहिला वर्ग हा त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञाकडून शिक्षकांसाठी घेतला जावा.
- अनेकदा शिक्षक हे विद्यार्थ्यांपेक्षाही अनभिज्ञ असतात.
- शिक्षकांचे ऑनलाईन तंत्राच्या बाबतीत प्रशिक्षण हे खूप महत्वाचे आहे.
- तसेच काही शिक्षण विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे.
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना देशातील आयटी कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे बेकायदा अक्सेस, पॉर्नसारखे अनुचित कन्टेन्ट वापरणे कसे गुन्हेगारी कृत्य आहे, त्यासाठीची शिक्षा याबद्दलही समजवले जावे.
शिक्षण संस्था
- ऑनलाइन क्लासेससाठी योग्य सेवाच वापरा.
- केवळ मोफत मिळत आहे, म्हणून वाट्टेल ती सेवा वापरू नये. तसेच दर्जेदार सेवेच्या फ्री पॅकेजमध्ये काही मर्यादा असू शकतात. त्यामुळे मोफतचा हव्यास नसावा.
- प्रत्येक लाइव्ह सेवेत अॅक्सेससाठी काही नियम, अटी असतात, त्यांचे पालन कडकपणे केले जावे.
- अशा सेवेत कोणाला किती अॅक्सेस अधिकार तेही ठरवण्याची सोय असते ती काटेकोरपणे वापरण्यात यावी.
- ज्या डिव्हाइसचा वापर शिक्षण संस्था ऑनलाइन शिक्षणासाठी करतात, त्यांचे यूएसबी तसेच इतर अॅक्सेस हे पासवर्ड प्रोटेक्टेड सिंगल वन टाइम यूजचेच असले पाहिजेत.