मुक्तपीठ टीम
राजकारणात कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि प्रभावशाली नेते अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील होणाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता कॅप्टनच जुनी टीम सोडून नवी टीम निवडणार का? असा काँग्रेस नेत्यांची झोप उडवणारा मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर अमरिंदर सिंग मंगळवारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतील.
या महिन्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस हायकमांडने कॅप्टन यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन म्हणाले होते की, पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आपल्याला अपमानित वाटले. मुख्यमंत्री पदानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन खुलेपणाने अनेक वेळा म्हणाले की, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना कोणत्याही किंमतीत मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी असेही म्हटले होते की सिद्धू यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी मैत्री आहे. सिद्धूच्या विरोधात आपण प्रबळ उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅप्टनच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवले.