मुक्तपीठ टीम
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या मनात आईचं स्थान हे सर्वोच्चच राहतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच पाहा. संघ सेवयंसेवक ते भाजपा नेते, मुख्यमंत्री ते पंतप्रधान मोदी कोणत्याही पदावर असले तरी त्यांच्या आई हिराबेनसाठी ते हळवेच राहिलेत. आज आईच्या शंभराव्या वाढदिवशी ते आशीर्वादासाठी पोहचले आणि अर्थातच त्याचीही बातमी झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांचा आज १०० वा वाढदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदी त्यांची भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आईची भेट घेतली. ते क्षण भावूक करणारे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई त्यांच्या भावाच्या घरी गांधीनगरजवळच्या रायसन भागात राहत आहेत. पंतप्रधान मोदी आपली सर्व कामं संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पूजा केली. भगवंताची आरती झाल्यावर आईचे पाय धुतले आणि ते पाणी आपल्या डोळ्यांना लावले. शाल व पुष्पहार घालून त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आई हीराबेन यांनीही आपल्या लेकाला मिठाई खाऊ घालून आशीर्वाद दिले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईसोबत काही वेळ घालवला. पंतप्रधान मोदी नेहमी वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आईला भेटत असतात. तसेच जेव्हाही ते गुजरातला जातात तेव्हा ते त्यांच्या आईला भेटण्याचा प्रयत्न करतात. वेळ मिळेल तेव्हा ते त्याच्या आईलाही भेटतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आई हीराबेन यांची अनेकदा भेट घेतली आहे.
शेवटी आई ती आईच. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी तिची बाळच असतात. तसंच मुलांसाठीही आईचं महत्व जगात वेगळंच. मग एखादे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पोहचले तरी हिराबेनसाठी बाळच आणि देशातील सर्वशक्तिमान पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदींसाठी आई ती आईच…जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती!