Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘मन की बात’मध्ये मोदींचे प्रश्न, श्रोत्यांची उत्तरं…बक्षीसंही!

वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ जशी होती तशी मराठीत!

June 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ आज काहीशी वेगळी होती. वेगळी यासाठी की मोदींनी सुरुवातीलाच एक स्पर्धा जाहीर केली. त्यांनी श्रोत्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं माय गव्ह पोर्टलवर द्यायची होती. योग्य उत्तरांना चांगली बक्षीसंही आहेत.

 

मोदींची मन की बात मराठीत जशी होती तशी…

नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो! नेहमीच ‘मन की बात’ मध्ये, आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. ह्या वेळी मला वाटले, काहीतरी वेगळे करावे, मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका!

  • ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता?
  • ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत?
  • ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

मित्रांनो, उत्तरे मला पाठवू नका, परंतु मायगव्ह मध्ये जर आपण ऑलिंपिकवर प्रश्नोत्तरी मधील प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण खूप सारी बक्षीसे जिंकू शकाल. मायगव्हच्या ‘रोड टू टोकियो’ ( टोकियो ला जाण्याचा मार्ग ) ह्या प्रश्नोत्तरीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत. आपण ‘रोड टू टोकियो’(टोकियो ला जाण्याचा मार्ग ) प्रश्नोत्तरी मध्ये भाग घ्या. भारताने यापूर्वी कशी कामगिरी केली आहे ? आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे? – हे सर्व स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या प्रश्नोत्तरी स्पर्धेत नक्की भाग घ्या.

 

मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.

 

त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक विनंती केली होती. मी म्हणालो की तुम्ही तर १९६४ मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. म्हणून, यावेळी, जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत, तेव्हा आपण आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे, त्यांना आपल्या संदेशाद्वारे प्रेरित करावे. क्रीडा विषयासाठी ते इतके समर्पित आणि भावूक होते की आजारी असतानाही, त्यांनी त्वरित सहमती दर्शविली. पण दुर्दैवाने, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मला आजही आठवते की ते २०१४ मध्ये सुरतला आले होते. आम्ही एका नाईट मॅरॅथॉनचे उद्घाटन केले होते. त्यावेळी त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या, खेळाविषयी बोलणे झाले, त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती.

 

आपल्या सर्वांना माहिती आहेच की मिल्खा सिंहजी यांचे संपूर्ण कुटुंब खेळाविषयी समर्पित आहे, भारताचा गौरव वाढवत आहे.

 

मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडू वृत्ती ( स्पोर्ट्समन स्पिरिट) एकत्र येते, तेव्हा कुठे एखादा ‘ विजेता’ तयार होतो. आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, भागातून ( कसब्यातून ),खेड्यातून येतात. आमचा जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधवजींच्या बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण जी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव जी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात.

 

ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडीलमजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची बाब/ गोष्ट आहे. तसंच,अजून एक खेळाडू आहेत, आमच्या नेहा गोयलजी. नेहा टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्य आहेत. त्यांची आई तसेच बहिणी सायकल कारखान्यात काम करून कुटुंबाचा खर्च चालवतात. नेहाप्रमाणेच दीपिका कुमारी ह्यांच्या आयुष्याचा प्रवासही चढउतारांनी भरलेला आहे. दीपिका ह्यांचे वडील ऑटो रिक्षा चालवितात आणि आई एक नर्स आहे, आणि आता बघा दीपिका, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे भाग घेणाऱ्या एकमेव महिला तिरंदाज आहेत . पूर्वी संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या, दीपिका ह्यांना आपल्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत.

 

मित्रांनो, आपण जीवनात कुठेही पोहोचलो , कोणतीही उंची प्राप्त केली तरी मातीशी असलेले हे नातेच आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते.

संघर्षाच्या दिवसांनंतर मिळालेल्या यशाचा आनंद काही आगळाच असतो. टोक्योला जाणाऱ्या आमच्या खेळाडूंनी, बालपणी असा साधना-संसाधनाच्या अभावाचा सामना केला, परंतु ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले, कष्ट करत राहिले.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या प्रियंका गोस्वामीजी ह्यांचे जीवन देखील बरेच काही शिकवते. प्रियांका ह्यांचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियांकाला जी पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळते ती बॅग खूप आवडायची. त्याच आकर्षणामुळे त्यांनी प्रथम रेस-वॉकिंग स्पर्धेत भाग घेतला. त्या आता आज, त्या खेळातील, मोठ्या विजेत्या बनल्या आहेत.

भाला फेकीत भाग घेणारे शिवपालसिंहजी बनारसचे रहिवासी आहेत. शिवपालजी यांचे संपूर्ण कुटुंब या खेळाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, काका आणि भाऊ, सर्वजण भालाफेकीत निष्णात आहेत. त्यांच्या परिवाराची ही परंपरा त्यांना टोकियो ऑलिम्पिकसाठी उपयोगी होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या चिराग शेट्टी आणि त्यांचा साथीदार सात्विक साईराज ह्यांची हिंमत पण प्रेरणादायक आहे. अलीकडेच, चिरागच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या वर्षी स्वत: सात्विकही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. परंतु, या अडचणी असूनही, हे दोघे, पुरुष दुहेरी शटल स्पर्धेत आपले सर्वोत्तम योगदान देण्याची तयारी करत आहेत.

अजून एका खेळाडूशी मी आपली ओळख करून देऊ इच्छितो, ते आहेत, भिवानी, हरियाणा येथील मनीष कौशिक. मनीषजी शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणी शेतात काम करता करता मनीष ह्यांना मुष्टियुद्धाची आवड निर्माण झाली. आज हीच आवड त्यांना टोकियोला घेऊन जात आहे.

 

आणखी एक खेळाडू आहेत सी.ए. भवानी देवी. नाव भवानी आहे आणि त्या तलवारबाजी मध्ये निष्णात आहेत. चेन्नईच्या रहिवासी असलेल्या भवानी ह्या ऑलिंपिकमध्ये पात्र ठरलेल्या पहिल्या तालवारबाज आहेत. मी कुठेतरी वाचले होते की भवानीजी यांचे प्रशिक्षण चालू राहावे म्हणून त्यांच्या आईने आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते.

मित्रांनो, अशी बरीच नावे आहेत. पण ‘मन की बात’ मध्ये, आज त्यातील फक्त काही नावे मी सांगू शकलो आहे. टोक्योला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठी जात आहेत. ह्या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे आणि लोकांचे हृदयही जिंकायचे आहे. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण जाणीवपूर्वक किंवा नकळत दबाव आणायचा नाही आहे तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवायचा आहे.

 

सामाजिक माध्यमांवर #cheer4India ह्या हॅशटॅग सह आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊ शकता. ह्याशिवाय देखील आपल्याला काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण करायचे असेल तर तेही नक्कीच करा. आपल्याकडे अशी काही कल्पना असेल, जी आपल्या खेळाडूंसाठी, संपूर्ण देशाने एकत्र येऊन करायाची असेल, तर तुम्ही ती मला नक्की पाठवा. आपण सर्वजण मिळून टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना समर्थन देऊ या. Cheer4India!!!Cheer4India!!!Cheer4India!!!-

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्व देशवासीय कोरोनाविरूद्ध लढत आहोत, पण या लढ्यात आपण सर्वानी एकत्र येऊन, काही विलक्षण साध्य केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने अभूतपूर्व काम केले आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील ८६ लाखांहून अधिक लोकांनी, विनामूल्य लस घेऊन विक्रम केला व तो देखील एका दिवसात! इतक्या मोठ्या संख्येने भारत सरकारने विनामूल्य लसीकरण उपलब्ध केले आणि तेही एका दिवसात! साहजिकच ह्याविषयी बरीच चर्चा झाली आहे.

 

मित्रांनो, एक वर्षापूर्वी सर्वांसमोर एक प्रश्न होता की लस कधी येणार? आज आम्ही एका दिवसात, लाखो लोकांसाठी, ‘भारतात बनवलेली’ लस विनामूल्य देत आहोत आणि हेच नवीन भारताचे सामर्थ्य आहे.

 

मित्रांनो, देशातील प्रत्येक नागरिकास लसीची सुरक्षा मिळालीच पाहिजे, ह्या साठी आम्हाला सतत प्रयत्न करायचे आहेत. अनेक ठिकाणी लस घेण्याविषयीची, लोकांच्या मनातील दुविधा दूर करण्यासाठी अनेक संघटना, नागरी संस्थांतील लोक पुढे आले आहेत आणि ते सर्वजण मिळून खूप चांगले काम करत आहेत.

चला, आपण पण आज एका गावात जाऊ या आणि तेथील लोकांशी लसीविषयी बोलू या. आज जाऊया मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डूलारिया गावात.

पंतप्रधान: हॅलो!
राजेश : नमस्कार !
पंतप्रधान : नमस्ते जी |
राजेश: माझे नाव राजेश हिरावे, ग्रामपंचायत दुलारिया, भीमपूर ब्लॉक |
पंतप्रधानः राजेश जी, आता आपल्या गावात कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घ्यावे म्हणून मी फोन केला आहे.
राजेश: सर, इथे आता कोरोनाची परिस्थिती अशी काही नाही.
पंतप्रधान: सध्या लोक आजारी नाहीत?
राजेश: होय.
पंतप्रधान: गावाची लोकसंख्या किती? गावात किती लोक आहेत?
राजेश: गावात ४६२ पुरुष आणि 33२ महिला आहेत, सर.
पंतप्रधान: ठीक आहे! राजेश जी, तुम्ही लस घेतली आहे का?
राजेश: नाही सर, अजून घेतलेली नाही.
पंतप्रधान: अरे! का नाही घेतली?
राजेश: सर, इथल्या काही लोकांनी , व्हॉट्सअ‍ॅपवर काही खोटेनाटे पसरवले त्यामुळे लोक गोंधळात पडले आहेत, सर.
पंतप्रधान: मग तुमच्या मनात देखील भीती आहे का?
राजेश: हो सर, असा गोंधळ सगळ्या गावात पसरला होता सर.
पंतप्रधान: अरे रे, काय बोलता आहेत ? हे बघा राजेश जी …
राजेश: होय.
पंतप्रधान: माझे तुम्हाला आणि गावातील सर्व बंधू भगिनींना
असे सांगणे आहे की जर मनात भीती असेल तर ती काढून टाका.
राजेश: होय.
पंतप्रधान: आपल्या संपूर्ण देशातील 31 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे.
राजेश: होय.
पंतप्रधान: तुम्हाला माहिती आहे ना , मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत.
राजेश: हो सर.
पंतप्रधान: अरे माझी आई तर जवळजवळ 100 वर्षांची आहे. तिनेसुद्धा दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होते. पण हे पहा, लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते.
राजेश: होय.
पंतप्रधान: ह्यामुळे तुम्ही स्वत: लाच केवळ धोक्यात टाकता असे नाही तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता.
राजेश: होय.
पंतप्रधान: म्हणून राजेश जी, लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि 18 वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे.
राजेश: हो …
पंतप्रधान: तर हे गावात लोकांना सांगा. आणि गावात भीतीचे वातावरण असायचे तर काही कारणच नाही.
राजेश: त्याचे कारण सर, काही लोक अशा खोट्या अफवा पसरवतात, ज्याच्यामुळे लोक घाबरून जातात. उदाहरण म्हणजे लसीकरण झाल्यावर येणारा ताप आणि रोगाचा फैलाव म्हणजे माणसाच्या मृत्यूच होतो, इथपर्यंत देखील अफवा पसरवत आहेत.
पंतप्रधान: अरेरे … आज बऱ्याच रेडिओवर , बऱ्याच टीव्ही वर पहा, इतक्या सगळ्या बातम्या मिळतात आणि म्हणूनच लोकांना समजावून सांगणे फार सोपे झाले आहे.
आणि हे पहा, मी तुम्हाला सांगतो, भारतातील बरीच गावे अशी आहेत की जेथे सर्व लोकांना लस मिळाली आहे, म्हणजेच गावातील सगळे, अगदी शंभर टक्के लोक.
असं मी तुम्हाला एक उदाहरण देतो …
राजेश: होय.
पंतप्रधान: काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्हा आहे, या बांदीपुरा जिल्ह्यातल्या व्यवन (Weyan ) गावातील लोकांनी मिळून 100% लसीकरणाचे लक्ष्य ठरवले व ते पूर्णदेखील केले. आज काश्मीरच्या या गावातील 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण झालेलं आहे.
मला नागालँडच्या त्या तीन गावांविषयी देखील माहिती मिळाली आहे की जिथे सर्व लोकांचे, 100%लोकांचे लसीकरण झाले आहे.
राजेश – हो .. हो…
पंतप्रधान: राजेश जी, तुम्हीही तुमच्या आसपासच्या, आपल्या गावातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे आणि जसं आपण भ्रम म्हणता. तर होय, हा फक्त एक भ्रम आहे.
राजेश: हो …
पंतप्रधान: तर या गोंधळाचे उत्तर म्हणजे तुम्ही स्वत: चे लसीकरण करून घेऊनच प्रत्येकास समजावून सांगितले पाहिजे. कराल ना तुम्ही असे?
राजेश: हो सर.
पंतप्रधान: तुम्ही नक्की कराल का?
राजेश: हो सर, हो सर. मला तुमच्याशी बोलून मला असे वाटले की मी स्वतःही लस घेईन आणि लोकांनाही लस घ्यायला तयार करेन.
पंतप्रधान: बरं, गावात अजून कोणी आहे का ज्यांच्याशी मी बोलू शकेन?
राजेश: हो सर.

 

पंतप्रधान: कोण बोलणार?
किशोरीलाल: नमस्कार सर …
पंतप्रधान: नमस्कार , आपण कोण बोलत आहात?
किशोरीलाल: सर, माझे नाव किशोरीलाल दुर्वे आहे.
पंतप्रधान: तर किशोरीलाल जी, मी आता राजेश जी यांच्याशी बोलत होतो.
किशोरीलाल : हो सर |
पंतप्रधान: आणि ते मोठ्या खिन्नतेने सांगत होते की लसीच्या विषयी लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलतात.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: तुम्हीही ऐकलं आहे का?
किशोरीलाल: होय … मी ऐकलं आहे सर …
पंतप्रधान: तुम्ही काय ऐकले आहे?
किशोरीलाल: कारण हे सर … जवळच महाराष्ट्र आहे, तिथले काही नात्यातले, संबंधित लोक अशी अफवा पसरवत आहेत की लस घेतल्यावर लोक मरत आहेत, . कोणी आजारी पडत आहेत. खूप गोंधळ आहे सर, म्हणूनच लोक लस घेत नाहीत.
पंतप्रधान: नाही? .. मग काय म्हणतात?? आता कोरोना गेला आहे, असं म्हणतात का?
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: असं म्हणतात का की कोरोनाने काही होत नाही?
किशोरीलाल: नाही, कोरोना गेला आहे, असं नाही म्हणत सर, कोरोना तर आहे बोलतात. पण लस घेतली म्हणजे आजारपण येते, सगळे मरत आहेत, अशी परिस्थिती आहे असं म्हणतात ते सर.
पंतप्रधान: अच्छा? लसीमुळे मरत आहेत?
किशोरीलाल: आपले क्षेत्र आदिवासी-प्रदेश आहे, सर, तसेही येथील लोक घाबरतात, आणि अफवा पसरल्यामुळे लोक ते घेत नाहीत लस.
पंतप्रधान: हे पहा किशोरीलाल जी …
किशोरीलाल: हो सर …
पंतप्रधान: या अफवा पसरविणारे लोक सतत अफवा पसरवत राहतील.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आपल्याला तर आपले प्राण वाचवावे लागतील, ग्रामस्थांना वाचवावे लागेल, आपल्या देशवासीयांना वाचवावे लागेल. आणि असं कोणी म्हटलं की कोरोना गेला आहे तर या भ्रमात राहू नका.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: हा रोग असा आहे, हा बहुरूपी आहे.
किशोरीलाल: हो सर.
पंतप्रधान: तो रूप बदलतो … तो नवनवे रूप घेऊन पोहोचतो आहे.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आणि त्यातून सुटण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एकतर कोरोनासाठी बनविलेले नियम, मास्क घालायचा , साबणाने वारंवार हात धुवायचे, अंतर ठेवायचे आणि दुसरा मार्ग म्हणजे ह्या बरोबरच लस देखील टोचुन घ्यायची , ही लस देखील चांगले सुरक्षा कवच आहे. तर त्याच्याबद्दल चिंता करा.
किशोरीलाल: होय.
प्रधानमंत्री : अच्छा किशोरीलाल जी मला सांगा
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री :जेव्हा लोक आपल्याशी बोलतात तेव्हा आपण लोकांना कसं समजावून सांगता ? आपण समजावून सांगता की आपणही अफवांवर विश्वास ठेवता ?
किशोरीलाल : समजावू काय ? असे लोक जास्ती असतील तर सर मलाही भीती वाटते सर.
प्रधानमंत्री : हे बघा किशोरीलाल जी, आज आपण बोललो, आपण माझे मित्र आहात.
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आपण स्वतः घाबरायचं नाही आणि लोकांची भीतीही दूर करायची आहे. कराल ?
किशोरीलाल : हो सर. लोकांच्या मनातली भीती दूर करेन सर,मी स्वतः ही लस घेईन
प्रधानमंत्री : हे पहा, अफवांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्याला माहित आहे, आपल्या वैज्ञानिकांनी किती परिश्रमाने ही लस तयार केली आहे.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : वर्षभर, अहोरात्र मोठ-मोठ्या वैज्ञानिकांनी काम केलं आहे,म्हणूनच आपला विज्ञानावर विश्वास हवा,वैज्ञानिकांवर विश्वास हवा आणि हे अफवा पसरवणाऱ्या लोकांना वारंवार समजवायला पाहिजे की असे होत नाही, इतक्या लोकांनी लस घेतली आहे, काही होत नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि अफवांपासून सांभाळून राहायला हवं, त्यापासून दूर राहायला हवं आणि गावालाही अफवांपासून दूर ठेवत वाचवायला हवं.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि राजेशजी,किशोरीलालजी,आपल्यासारख्या मित्रांना तर मी सांगेन की आपण केवळ आपल्या गावातच नव्हे तर आणखी इतर गावातही अशा अफवा रोखण्यासाठी काम करा आणि लोकांना सांगा की माझ्याशी याबाबत बोलणे झालं आहे म्हणून.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : सांगा, माझं नाव सांगा त्यांना
किशोरीलाल : सांगू, सर आणि लोकांना सांगू आणि त्यांना समजावू आणि स्वतःही घेऊ
प्रधानमंत्री : पहा, आपल्या संपूर्ण गावाला माझ्याकडून शुभेच्छा द्या
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आणि सर्वाना सांगा, जेव्हा आपला नंबर येईल…
किशोरीलाल : हो …
प्रधानमंत्री : लस नक्की घ्या.
किशोरीलाल : ठीक आहे सर
प्रधानमंत्री : गावातल्या महिलांना,आपल्या माता- भगिनींचा …
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : या कामात जास्तीत जास्त सहभागी करून घ्या आणि सक्रीय सहभागासह त्यांना आपल्या समवेत ठेवा
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : कधी कधी माता- भगिनी जे सांगतात ना ते लोकांना लवकर पटते
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या गावात लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मला सांगाल ना ?
किशोरीलाल : हो, सांगेन सर
प्रधानमंत्री :नक्की सांगाल ?
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या पत्राची मी प्रतीक्षा करेन
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : चला, राजेश जी, किशोर जी खूप- खूप धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
किशोरीलाल : धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात. आपल्यालाही खूप- खूप धन्यवाद.

मित्रानो, कधी ना कधी,जगासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल की भारतातल्या गावातल्या लोकांनी,आपल्या वनवासी-आदिवासी बंधू- भगिनींनी कशा प्रकारे आपल्या समंजसपणाची , सामर्थ्याची प्रचीती दिली. गावातल्या लोकांनी विलगीकरण केंद्रे तयार केली, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉल तयार केले. गावातल्या लोकांनी कोणाला उपाशी राहू दिले नाही, शेतीची कामेही खोळंबू दिली नाहीत. जवळच्या शहरात दररोज दुध-भाज्या पोहोचत राहतील याची काळजी घेतली. म्हणजेच स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही सांभाळले. लसीकरण अभियानातही आपल्याला असेच करायचे आहे. आपण जागरूक रहायचं आहे आणि जागरूक करायचंही आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे हे प्रत्येक गावाचे लक्ष्य असले पाहिजे. लक्षात ठेवा, आणि मी तर आपणाला विशेष करून सांगतो. आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा – प्रत्येक जण यशस्वी होऊ इच्छितो मात्र निर्णायक यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे ? निर्णायक सफलतेचा मंत्र आहे -निरंतरता. म्हणूनच आपल्याला शिथिल राहायचं नाही, कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. आपल्याला अखंड प्रयत्न करत राहायचं आहे, कोरोनावर विजय मिळवायचा आहे.

 

माझ्या प्रिय देश बांधवानो,

आपल्या देशात आता मान्सूनचा हंगाम आला आहे. ढग बरसू लागतात तेव्हा ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठीही बरसतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरून साठते आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळीही सुधारते. म्हणूनच जल संरक्षण म्हणजे देश सेवेचेच एक रूप आहे असे मी मानतो. आपण पाहिले असेल की आपल्यापैकी अनेक लोक या पुण्य कामाला आपली जबाबदारी मानून हे काम करत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे उत्तराखंड मधल्या पौड़ी गढ़वाल इथले सच्चिदानंद भारती जी. भारती जी एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातूनही लोकांना अतिशय उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांच्या परिश्रमातूनच पौड़ी गढ़वाल मधल्या उफरैंखाल भागातले पाण्याचं मोठ संकट शमलं आहे. जिथे लोक पाण्याकडे डोळे लावून बसले होते तिथे आता वर्षभर पाण्याचा पुरवठा होत आहे.

मित्रहो,

डोंगराळ भागात जल संधारणाची पारंपारिक पद्धत आहे त्याला ‘चालखाल’ असेही म्हटले जाते. म्हणजे पाणी जमा करण्यासाठी मोठा खड्डा खोडणे. या परंपरेशी भारती जी यांनी आणखी नव्या पद्धतीची सांगड घातली.त्यांनी सातत्याने लहान-मोठे तलाव तयार केले. यातून उफरैंखाल इथला डोंगराळ भाग हिरवागार तर झालाच शिवाय लोकांचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारती जी यांनी असे ३० हजार पेक्षा जास्त तलाव तयार केले आहेत. 30 हजार ! त्यांचं हे भगीरथ कार्य आजही सुरूच असून अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

मित्रहो,

अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाँदा जिल्ह्यातल्या अन्धाव गावातल्या लोकांनीही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभियाना ला नावही मोठे मनोरंजक दिले आहे ,‘शेतातलं पाणी शेतात,गावाचं पाणी गावात.. या अभियानाअंतर्गत गावातल्या शंभर बिघा शेतात उंच- उंच बांध केले आहेत. यामुळे पावसाचे पाणी शेतात जमा व्हायला लागले आणि जमिनीत मुरायला लागले. आता हे लोक शेताच्या बांधावर झाडे लावण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच आता शेतकऱ्याला पाणी, झाडे आणि पैसा तीनही मिळेल.आपल्या उत्तम कार्यामुळे त्यांच्या गावाची कीर्ती दूर-दूर पर्यंत पोहोचत आहे.

 

मित्रहो,

या सर्वांकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आजू-बाजूला ज्या प्रकारे पाण्याची बचत करता येईल, आपण बचत करायला हवी. मान्सूनचा हा महत्वाचा काळ आपण वाया जाऊ देता कामा नये.
माझ्या प्रिय देश बांधवानो, आपल्या शास्त्रामध्ये म्हटल आहे,
“नास्ति मूलम् अनौषधम्” ||

 

म्हणजे या भूतलावर अशी कोणतीही वनस्पती नाही जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे- वनस्पती असतात ज्यांचे अद्भुत गुणधर्म असतात मात्र आपल्याला अनेकदा त्याबाबत माहिती नसते. नैनीताल मधून एका मित्राने भाई परितोष यांनी या विषयावर मला पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की गुळवेल आणि दुसऱ्या आणखी काही वनस्पतींचे अद्भुत औषधी गुणधर्म आपल्याला कोरोना आल्यानंतरच समजले . आपण आपल्या आजूबाजूच्या वनस्पतीविषयी जाणून घ्यावे आणि दुसऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी असे ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांना मी सांगावे असा आग्रह परितोष यांनी केला आहे. खर तर हा आपला शेकडो वर्षापासूनचा वारसा आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. याच दिशेने मध्य प्रदेश मधल्या सतना इथले रामलोटन कुशवाहा जी,यांनी प्रशंसनीय काम केले आहे. रामलोटन यांनी आपल्या शेतात देशी संग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयात त्यांनी शेकडो औषधी वनस्पती आणि बियाण्यांचा संग्रह केला आहे. लांब-लांबच्या भागातून त्यांनी हे आणले आहे. याशिवाय ते दर वर्षी अनेक प्रकारच्या भारतीय भाज्याची लागवड करतात. रामलोटन यांची ही बाग, हे संग्रहालय बघायला लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीही शिकतात. खरंच हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात असाच प्रयोग करता येऊ शकतो. आपणापैकी जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करू इच्छितात त्यांनी हा जरूर करावा अशी माझी इच्छा आहे. यातून उत्पन्नाचे नवे साधनही प्राप्त होऊ शकते. स्थानिक वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या भागाची ओळख वाढेल असाही एक फायदा होऊ शकतो.

 

माझ्या प्रिय देशबांधवानो,

काही दिवसानंतर 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. देशाचे थोर डॉक्टर बीसी राय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आपल्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपली सेवा केली आहे. म्हणूनच या वेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्वाचा आहे.

 

मित्रहो, औषध जगतातल्या सर्वात आदरणीय लोकांपैकी एक असलेल्या हिप्पोक्रेट्स यांनी म्हटले होते
“Wherever the art of Medicine is loved, there is also a love of Humanity.”
म्हणजे जिथे Art of Medicine साठी प्रेम असते तिथे मानवतेसाठीही प्रेम असते. प्रेमाच्या याच सामर्थ्याने डॉक्टर आपली सेवा करू शकतात. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की तितक्याच प्रेमाने आपण त्यांचे आभार मानूया त्यांचा उत्साह वाढवूया. आपल्या देशात असे लोकही आहेत जे डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊन काम करत आहेत. श्रीनगर मधल्या अशाच एका प्रयत्नाबाबत मला माहिती मिळाली. इथे दल सरोवरात नावेमध्ये बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. श्रीनगरच्या तारिक अहमद पातलू जी हे हाउस बोटचे मालक असून त्यानी ही सेवा सुरु केली. त्यांनी स्वतः कोरोना-19 शी झुंज दिली आहे आणि त्यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या या अ‍ॅम्ब्युलन्समधून जन जागृतीचे अभियान चालवण्यात येते आणि ते सातत्याने अम्ब्युलन्समधून घोषणाही करत असतात. लोकांनी मास्कचा वापर करण्यापासून ते कोरोना संदर्भात इतरही आवश्यक काळजी घ्यावी हा यामागचा उद्देश आहे.

 

मित्रहो, डॉक्टर दिनाबरोबरच 1 जुलै हा दिवस चार्टड अकाउंटड दिन म्हणजे सनदी लेखापाल दिन म्हणूनही साजरा केला जातो.काही वर्षांपूर्वी मी देशातल्या सनदी लेखापालांकडून जागतिक स्तरावरच्या भारतीय ऑडिट कंपन्या तयार करण्याची भेट मागितली होती. आज मी त्यांना याचे स्मरण करून देऊ इच्छितो. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात. सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो.

 

माझ्या प्रिय देश बांधवानो,

कोरोना विरोधातल्या भारताच्या लढ्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. या लढ्यात देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका बजावली आहे. “मन की बात” मध्ये मी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र काही लोकांची तक्रार आहे की त्यांच्या बाबतीत मात्र तितकेसे बोलले जात नाही. बँकेचे कर्मचारी असोत, शिक्षक असोत, छोटे व्यापारी किंवा दुकानदार असोत, दुकानांमध्ये काम करणारे लोक असोत, फेरीवाले बंधू-भगिनी असोत, सुरक्षा कर्मचारी, पोस्टमन किंवा टपाल कार्यालयाचे कर्मचारी खर तर ही यादी खूपच मोठी आहे आणि प्रत्येकाने आपले काम चोखपणे बजावले आहे. शासन- प्रशासन स्तरावरही अनेक लोक वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत आहेत.

 

मित्रहो, आपण कदाचित केंद्र सरकार मध्ये सचिव असणारे गुरु प्रसाद महापात्रा जी यांचे नाव ऐकले असेल. आज “मन की बात” मध्ये मी त्यांचाही उल्लेख करू इच्छितो. गुरुप्रसाद जी यांना कोरोना झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते आणि आपले कर्तव्यही बजावत होते. देशात ऑक्सीजनचे उत्पादन वाढावे आणि दुर्गम भागापर्यंत ऑक्सीजन पोहोचावा यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. एकीकडे कोर्ट कचेरी, मिडीयाचा दबाव एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत राहिले, आजारपणातही त्यांनी काम थांबवले नाही. येऊ नका असे सांगूनही ते हट्टाने ऑक्सीजन बाबतच्या पत्रकार परिषदाना उपस्थित राहत असत. इतकी त्यांना देशवासीयांची चिंता होती. रुग्णालयात असतानाही ते आपली चिंता न करता देशातल्या लोकांसाठी ऑक्सीजन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब आहे की या कर्मयोग्यालाही देशाने गमावलं आहे, कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावलं आहे. असे असंख्य लोक आहेत ज्यांची कधी चर्चाही होऊ शकली नाही. कोविड विषयीच्या नियमांचं संपूर्ण पालन आणि लस घेणे हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल.

 

माझ्या प्रिय देश बांधवानो,

“मन की बात’ ची सर्वात चांगली बाब ही आहे की यात माझ्यापेक्षा आपणा सर्वांचे योगदान जास्त असते. आताच मी चेन्नईच्या थिरु आर. गुरुप्रसाद जी यांची MyGov मध्ये एक पोस्ट पाहिली. त्यांनी लिहिले आहे, “मन की बात”कार्यक्रमाचे ते नियमित श्रोता आहेत. गुरुप्रसाद जी यांच्या पोस्टमधल्या काही ओळी मी सांगतो. त्यांनी लिहिले आहे,

 

आपण जेव्हा तामिळनाडू विषयी बोलता तेव्हा माझी रुची अधिक वाढते. आपण तमिळ भाषा,तमिळ संकृतीची थोरवी, तमिळ सण आणि तामिळनाडूच्या प्रमुख स्थानांची चर्चा केली आहे.

 

गुरु प्रसाद जी आणखी लिहितात, “मन की बात” मध्ये तामिळनाडू मधल्या लोकांच्या कामगिरी बाबतही अनेकदा सांगितले आहे. तिरुक्कुरल बाबत आपला स्नेह आणि तिरुवल्लुवर जी यांच्या प्रती आपला आदर याबाबत तर काय वर्णावे ! म्हणूनच ‘मन की बात’ मध्ये आपण तामिळनाडूविषयी जे सांगितले आहे ते सर्व संकलित करून त्याचे ई- बुक तयार केले आहे. आपण या ई- बुक विषयी काही बोलाल का आणि नमो अॅप ते प्रकाशित कराल का ? धन्यवाद

 

हे मी गुरुप्रसाद जी यांचे पत्र आपल्याला वाचून दाखवत होतो.

गुरुप्रसाद जी, आपली ही पोस्ट वाचून खूप आनंद झाला. आपण आपल्या ई- बुक मध्ये एक आणखी पान जोडा.
..’नान तमिलकला चाराक्तिन पेरिये अभिमानी |
नान उलगतलये पलमायां तमिल मोलियन पेरिये अभिमानी |..’
उच्चारात काही दोष नक्कीच असेलही मात्र माझा प्रयत्न आणि माझा स्नेह कधीच कमी होणार नाही. जे तमिळ भाषक नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की मी गुरुप्रसाद जी यांना सांगितले आहे-

 

मी तमिळ संस्कृतीचा खूप मोठा प्रशंसक आहे.

जगातली सर्वात प्राचीन भाषा तमिळचा मी मोठा प्रशंसक आहे.
मित्रहो, प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीने जगातली सर्वात प्राचीन भाषा आपल्या देशात आहे, याचा गुण गौरव करायलाच हवा, त्याचा अभिमान बाळगायला हवा. मलाही तमिळ बाबत अतिशय अभिमान आहे. गुरु प्रसाद जी, आपला हा प्रयत्न माझ्यासाठी नवा दृष्टीकोन देणारा आहे. कारण मी जेव्हा ‘मन की बात’ मधून संवाद साधतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीने माझे म्हणणे मांडतो. मला माहितही नव्हते की याचा हा ही एक घटक होता. आपण सगळ्या जुन्या गोष्टीचा संग्रह केला तेव्हा मीही एकदा नव्हे तर दोनदा त्या वाचल्या.गुरुप्रसाद जी आपले हे पुस्तक मी नमो अॅपवर नक्कीच अपलोड करेन. भविष्यातल्या प्रयत्नांसाठी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा !

 

माझ्या प्रिय देश बांधवानो,

आज आपण कोरोना काळातल्या अडचणी आणि खबरदारी याबाबत बोललो, देश आणि देशवासीयांच्या कामगिरी बाबतही चर्चा केली. आता एक आणखी संधी आपल्या समोर आहे. 15 ऑगस्ट येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत-महोत्सव आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपण देशासाठी जगण्याचे शिकलो.स्वातंत्र्याचा लढा – देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कथा आहे. स्वातंत्र्यानंतर या काळाला आपल्याला देशासाठी जगणाऱ्यांची कथा करायची आहे. आपला मंत्र असायला हवा -India First.
आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे
– India First

 

मित्रहो,

अमृत महोत्सवा साठी देशाने काही सामुहिक उद्दिष्टेही निश्चित केली आहेत. आपल्या स्वातंत्र्य सेनानीचे स्मरण करतानाच त्यांचा संलग्न इतिहास पुनर्जीवित करायचा आहे. आपल्या स्मरणात असेल ‘मन की बात’ मध्ये मी युवकांना, स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करून इतिहास लिहिण्याचे आवाहन केले होते. युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा, युवा विचार समोर यावेत, नव्या उर्जेने युवकांनी लिखाण करावे असा त्यामागचा विचार होता. अतिशय कमी वेळेत आधीच हजाराहून जास्त युवक या कामासाठी पुढे आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद झाला.

 

मित्रहो, मनोरंजक बाब ही आहे की 19 व्या 20 व्या शतकाच्या लढ्याची चर्चा होते मात्र 21 व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा माझ्या युवा मित्रांनी, 19 व्या 20 व्या शतकाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गाथा लोकांसमोर आणण्याची आघाडी सांभाळली आहे. या सर्व लोकांनी माय गव्ह वर याची संपूर्ण माहिती पाठवली आहे. हे लोक हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड, बांग्ला, तेलुगू, मराठी, मल्याळम, गुजराती, अशा देशाच्या वेगवेगळ्या भाषात स्वातंत्र्य लढ्यावर लिहिणार आहेत. कोणी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आपल्या आजूबाजूच्या स्थळांची माहिती गोळा करत आहे, तर कोणी आदिवासी स्वातंत्र्य सेनानीवर पुस्तक लिहित आहे. ही एक उत्तम सुरवात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जसे योगदान देता येईल त्याप्रमाणे जरूर द्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचे आपण साक्षीदार होत आहोत हे आपले भाग्य आहे. म्हणूनच पुढच्या वेळी ‘मन की बात’मध्ये आपल्याशी संवाद साधताना अमृत-महोत्सवाच्या आणखी तयारीबाबतही चर्चा करूया. आपण सर्व आरोग्यसंपन्न राहा, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करत वाटचाल करा, आपल्या नव-नव्या प्रयत्नातून देशाच्या विकासाला अशीच गती देत राहा. या शुभेच्छांसह खूप-खूप धन्यवाद


Tags: PM Narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीमन की बात
Previous Post

मायावतींची मोठी घोषणा, बसपा स्वबळावरच लढवणार!

Next Post

केंद्र सरकारचा लसीकरणातील संख्याघोळ सुरुच!

Next Post
vaccination

केंद्र सरकारचा लसीकरणातील संख्याघोळ सुरुच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!