मुक्तपीठ टीम
संसदेच्या पावसाळी अधिवेशनला दोन आठवड्यांपूर्वी सुरुवात झाली. पण म्हणावे तेवढा वेळ कामकाज होत नाही. पहिल्या दिवसापासून विरोधकांनी संसदेत अनेक मुद्द्यावरून गदारोळ घातला. त्यामुळे संसदेचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहीचा आणि लोकांचा अपमान आहे, असे मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक खुपलं ते सोमवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केलेले ट्वीट. त्यांनी ट्वीट करत चर्चेविना विधेयक मंजूर करण्याबद्दल सरकारला टोला लगावला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “पहिल्या १० दिवसात मोदी-शहा यांनी १२ विधेयके मंजूर केली आणि सरासरी प्रत्येक विधेयकाला फक्त ७ मिनिटे मिळाली. कायदे बनवत आहात की पापड चाट!” ‘ डेरेक यांनी कोणत्या विधेयकावर किती वेळ किती काळ चर्चा झाली हे दर्शविणारा तक्ताही शेअर केला.
आज भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पापड चाट बनवण्याचे विधान हे निंदनीय आहे. संसदेत पत्रके फेकणे आणि याबद्दल माफीही न मागणे, याला अहंकार म्हणतात.”
मात्र, खासदारांच्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या सर्व खासदारांना संयम बाळगत, संसदेची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. त्यांनी सत्ताधारी खासदारांना सभागृहात कामकाज चालू ठेवणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असल्याचीही आठवण करुन दिली.
सभागृहाचे कामकाज ठप्प झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे. पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेत गदारोळ घातला. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा साधत खासदारांना जनता आणि मीडियासमोर त्यांना उघडं पाडत वास्तव मांडण्यास सांगितलं होतं.