मुक्तपीठ टीम
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात होणार आहे. लसीकरणाच्या तयारीसंबंधित चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याची बैठक बोलवली होती. यात पंतप्रधान यांनी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार असल्याची घोषणा केली. मात्र, यामध्ये पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लसींचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच येत्या काही महिन्यांत ३० कोटी जनतेला लस देण्याचे आमचे लक्ष्य आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. पण आता देशातील सर्व जनतेला लस मोफत मिळेल की नाही या प्रश्नावर पडदा पडला आहे.
दरम्यान, देशाला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेल्या दोन्ही लसी इतर देशांच्या तुलनेत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. तसेच या लस देशाची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, या लसीकरणात “सरकारी आणि खाजगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोरोनाशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दले, पोलीस आणि इतर निम्नलष्करी दले यांचे पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केले जाणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले. तसेच राज्यांनी हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने काटेकोरपणे राबवणे का गरजेचे आहे हेही पंतप्रधानांनी बैठकी दरम्यान सांगितले.