मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. कोकणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेकांच जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन दिलं असून यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे ट्वीट मोदींनी मराठी मध्ये केले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कोकणात पूर परिस्थिती
गेले काही दिवस मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळून पावसाने जोर कमी केल्याने पाणी हळूहळू ओसरत आहे. एनडीआरएफने रात्रीच बचावकार्य सुरु केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. बहुतेक नद्या पूररेषेच्या जवळून वाहत आहेत. हवामान विभागाने ४ ते ५ दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.