मुक्तपीठ टीम
कोकणातील माणसं कशी तर शहाळ्यासारखी. वरून वाटतील कडक. आतून मात्र गोड मलईसारखी. माणुसकी तर कोकणात समुद्रात उसळणाऱ्या लाटांसारखी कधीही न थांबणारी. कोकणातील पत्रकार मित्र महेश सावंत यांनी सांगितलेली गोष्ट अशीच फोंडाघाट हे माणुसकीचं गाव असल्याचं दाखवणारी. त्यांच्याच शब्दात…
फोंडाघाट बाजारपेठेत फिरणाऱ्या त्या आजीला अखेर निवारा मिळाला. फोंडाघाट ग्रामस्थांनी पुन्हा एकदा हा गाव संवेदनशील, दयाळू लोकांचा असल्याचे दाखवून दिले. पावणादेवी येथील ही तेली आजी गेली कित्येक वर्षे बाजारात वावरत होती. मात्र हल्ली तिची प्रकृती ढासळताना दिसत होती. ऊन असो नाहीतर पाऊस, आजीचा वावर नेहमी बाजारात असे. घरातील मंडळींना ती जुमानत नसे त्यामुळे तिला घरी घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न वाया जात होता. दिवसभर उपाशी इकडून तिकडून फिरून तेली आजी हल्ली वार्धक्याकडे झुकल्यासारखी वाटत होती.रस्त्याच्या मध्येच तिचा वावर होता. त्यामुळे अपघाताची भीती सर्वांनाच वाटत होती. रात्रीच्या वेळी तर अंधारात ही रस्त्यात उभी असलेली पटकन दिसत नव्हती. त्यामुळे एक ना एक दिवस तिचा अपघात होणार अस बोलल जायचं. पण करणार काय. सर्वांची हळहळ दिसत होती पण कोणीच काही करू शकत नव्हत. हल्ली तर ती वेडेपणात आक्रमक झालेली दिसत होती. जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी अखेर पणदूर येथील संविता आश्रमाला संपर्क केला. त्यांनी तिला घेऊन जाण्यास संमती दर्शविली. अशा वेडसर रुग्णांची देखभाल करताना आधीच मेटाकुटीस आलेल्या संवीता आश्रमाला थोडीशी मदत देण्याचं ठरलं. मदत अवघ्या दोन दिवसात उभारायची होती. व्हॉट्सॲप वरून मदतीसाठी एक पोस्ट फिरवली गेली आणि बघता बघता ४० हजारांची मदत उभी राहिली. मुंबई पासून लोकांनी मदत केली.ज्याला जमेल तशी त्याने मदत केली. शिक्षकांकडून दहा हजार व स्वतः संजय आग्रेंनी दहा हजार दिले, असे एकूण ६० हजार रुपये जमा झाले.
गुरुवारी दुपारी संविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब फोंडाघाट मध्ये आपल्या टिमसह दाखल झाले आणि त्या आजीला त्यांनी आपल्या गाडीत घालून घेऊन गेले.अशा वयोवृद्ध,निराधार,मनोरुग्ण लोकांसाठी संविता आश्रम हा हक्काचा निवारा बनल्याने या आश्रमाच्या संदीप परबांचा सत्कार फोंडाघाट वासियांतर्फे करण्यात आला. यावेळी फोंडाघाट वासियांकडून जी वागणूक मिळाली त्यामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रोख स्वरूपातील पैसे स्वीकारण्यास त्यांनी मनाई केली.त्यांनी सांगितल्याप्रमाणे उर्वरित सर्व रक्कम खात्यात भरली गेली. मुसळधार पावसात तेली आजी भिजून गारठली असती आणि आजारी ही पडली असती. परंतु त्याआधीच तिला सुरक्षित निवारा मिळाला.संकटात दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे हे फोंडाघाटच वैशिष्ट्य आहे….आणि ते आज ही झपल जातय. या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्या सर्वांचे आभार. आपल्या छोट्याशा पण अनमोल अशा मदतीने एका वृध्द मनोरुग्ण महिलेला सुरक्षित निवारा मिळाला आहे.आपले हे मदतीचे हात नेहमीच अशा प्रसंगी पुढे येवोत आणि त्यासाठी ईश्वर त्या हातांना बळकटी देवो हीच प्रार्थना.कारण मित्रांनो तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.जीवन सर्वांचंच अनमोल आहे. एका सुंदर वाक्याने आपला निरोप घेतो……..मोर नाचताना सुद्धा रडतो……आणि…राजहंस मरताना सुद्धा गातो…..दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात.