मुक्तपीठ टीम
कोकणात सातत्याने येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून येत्या ४ वर्षात साधारणत: एकूण ३२०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता दि. २३ सप्टेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाकडून १२०० कोटी रूपये तर १५ व्या वित्त आयोगाकडून २००० कोटी रूपये सहभाग असणार आहे. याद्वारे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ केंद्रे, निवारा केंद्रे बांधणी आदींचे नियोजन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून येत्या १५ दिवसात त्यास परवानगी देण्यात येईल. प्रस्ताव मंजुरीनंतर त्यासंदर्भातील निविदा काढून पुढील २-३ महिन्यात कामाची सुरूवात करण्यात येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य विजय उर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, प्रसाद लाड, विनायक मेटे, रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला होता.
धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू
धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेने आपला अहवाल सादर केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या निकषावर महाधिवक्ता यांचे अभिमत घेऊन आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एस.टी.च्या योजनांचा लाभ लागू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
धनगर समाजाच्या विकासासाठी २२ योजना राबविण्यासाठी १०० कोटी रूपये एवढा निधी घोषित करण्यात आला असून ८५ कोटी ३ हजार रुपयांची इतर तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासंबंधी ५५०० इतक्या विद्यार्थी संख्येस या शैक्षणिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या बांधवांना १० हजार घरे बांधून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सदाशिव खोत, प्रविण दरेकर, महादेव जानकर, गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.