मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय पातळीवर वेगळी भाजपविरोधी महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यात एक महत्वाची बाब आहे. राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांना उत्तरेतील नेत्यांसोबत एकत्र आणण्यासाठी हालचाली होत आहेत. पवार-ठाकरे-यादव अशा तीन नेत्यांना एकत्र आणलं तर २०२२च्या मुंबई मनपा निवडणुका आणि उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांना फायदा होईल, असं समीकरण सपा नेते माजी खासदार राम चरित निषाद मांडत आहेत.
२०२२ मध्ये महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि यूपीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सपाच्या उत्तरप्रदेशातील नेत्याने सुरु केले आहेत.
सपा नेते माजी खासदार राम चरित निषाद यांनी नव्या महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशातील मछली शहराचे माजी खासदार निषाद यांनी सांगितले की, “उत्तर भारतीय नागरिक आता शहाणा झाला आहे. त्यामुळे आता ते भाजपच्या दबावाखाली येणार नाहीत.”
निषाद पुढे म्हणाले की, “या पुढील काळात उत्तर भारतीय समाज त्याच महाआघाडीच्या सोबत जाईल, जिथे त्यांच्या प्रश्नांचा विचार केला जाईल, त्यांना संरक्षण दिले जाईल आणि मान-सन्मान दिला जाईल. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला समाजवादी पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे. समाजवादी पार्टी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत जोरदार लढत देणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही महाआघाडीच्या सरकारमध्ये एकजुटीने आहोत तसेच मुंबई मनपामध्येही रहाण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
निषाद यांचे तिकिट कापण्याचे महाराष्ट्र कनेक्शन
उत्तर प्रदेशमधील मछली शहरातून भाजपचे खासदार राहिलेले राम चरित्र निषाद यांचे तिकिट कापण्यामागेही महाराष्ट्र कनेक्शन आहे. त्यांचे तिकिट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे समर्थक असल्यामुळे कापल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर ते समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत गेले. निषाद यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक समाजवादी पक्षातर्फे लढवली होती.
सत्तेवर असतानाही भाजपा उत्तर भारतीयांसोबत नव्हती
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना उत्तर भारतीयांचे प्रश्न सुटले नाहीत. भाजपाने उत्तर भारतीयांना ना मान दिला, ना पद दिले, ना प्रतिष्ठा दिली. मी पाच वर्षे भाजपमध्ये राहिलो, पण मला नेहमीच महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. कारण मछली शहरातील अनेक रहिवाशी हे मुंबई आणि त्या आसपासच्या भागात राहणारे आहेत. तसेच भाजपमध्ये असताना मी कधीच पाहिले नाही की, मुंबईतील उत्तर भारतीयांच्या प्रश्नावर भाजप त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.