मुक्तपीठ टीम
आपल्या खिशात पैसे असतील तर त्यातील काही खर्च करून दुसऱ्याला मदत करणे समजू शकतो, पण जेव्हा स्वत:कडेच नसताना एखादा सामान्य माणूस पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडरची मदत करतो तेव्हा त्याला महासंकटातील महानायकच म्हटले पाहिजे.
मुंबईच्या मालवणी भागातील डेकोरेटर म्हणून काम करणारे पास्कल सालदान्हा हे सजावट करतानाच जीवनात चांगल्या वागण्याने सौंदर्य फुलवतात. ते नेहमीच समाजाच्या भल्यासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा शालोमच्या शाळेतून मुख्याध्यापकांचा फोन आला. त्या ऑक्सिजनच्या सिलिंडरची मागणी करत होत्या. त्यानंतर पास्कल यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याजवळ सिलिंडर त्वरित पोहोचवला आणि यामुळे शाळेतील एका कोरोनाग्रस्त शिक्षकाचा जीव वाचला. त्यानंतर त्यांना सतत शाळेतून वेगवेगळ्या लोकांचे कॉल येऊ लागले. प्रत्येकाला ऑक्सिजन पाहिजे असे. पास्कल यांची पत्नी गेली पाच वर्षे अंथरुणावर खिळली आहे. तिच्यासाठी ते नेहमीच घरात ३ ते ४ सिलिंडरचा साठा ठेवतात. पण आता तो संपला. तराही लोकांची मागणी काही थांबत नव्हती. उलट वाढू लागली. आणखी सिलिंडर आणायचे कसे, हा प्रश्न पडला. त्यावेळी पत्नी पुढे सरसावली. ती म्हणाली, तुम्ही माझे दागिने विका. पण तुमच्या मनात आहे तशी लोकांना मदत करा. तिच्या सांगण्यावरूनच त्यांनी दागिने विकले. पत्नीचे दागिने विकून आलेल्या एक लाखात आणखी काही पैसे घालून ८ ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. त्यामुळे ते आता आणखी काहींना मदत करु शकतात. पास्कल सांगतात, ‘माझ्या पत्नीने, तिच्या आयुष्याची काळजी न करता, ही सिलिंडर गरजूंना पुरवण्यास सांगितले.”
किडनी निकामी झाल्यामुळे आणि ब्रेन हॅमरेज झाल्यापासून पास्कल यांची पत्नी रोझी गेल्या ५ वर्षांपासून अंथरुणावर खिळलेली आहे. तरीही ती पतीला समाजासाठी काम करायची प्रेरणा देते. पास्कल आणि आता त्यांचा मुलगा शालोमही समाजासाठी झटतात. हेच खरे महासंकटातील महानायक!
पाहा व्हिडीओ: