मुक्तपीठ टीम
राज्यात सध्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं असताना सरकारने परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी केली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. या साऱ्या पाश्वभूमीवर काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासोबत हायव्होल्टेज बैठकी सुरू होत्या. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्विटरवर सविस्तर माहिती दिली आहे. या अधिकाऱ्यांसोबतच इतरही पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे. यामध्ये रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसोबत अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘ एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे.अखेर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.
परमबीर सिंग यांचा कार्यकाळ
- गेले सव्वा वर्ष परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते.
- सिंग यांनी कोरोना काळातील परिस्थिती, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामींवरील कारवाई ही प्रकरणे हाताळले आहेत.
- उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात मुंबई पोलिसांचा सहभाग उघड झाल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली.