मुक्तपीठ टीम
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरडीएक्सच्या स्फोटापेक्षाही जबरदस्त राजकीय धक्का देणारा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महास्फोटक पत्र लिहिले आहे. या पत्रातील महास्फोटक गौप्यस्फोटांमुळे आता राज्यात सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकारपुढील संकट जास्तच वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनात परमबीर सिंह यांची पाठराखण करणारी भूमिका मांडली गेली. त्यानंतर आज त्याच परमबीर सिंहांनी आतापर्यंत शिवसेनेला अडचणीत आणणारे सचिन वाझे हे राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी वसुलीचे काम करत होते, असा आरोप केल्याने त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप करून एकप्रकारे तेच सचिन वाझेंचे गॉडफादर असल्याचा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
गृहमंत्री देशमुखांनी आरोप फेटाळले
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंह यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाझेप्रकरणी होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी सिंग यांनी खोटे आरोप केले आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
परमबीर यांच्या पत्रातील गौप्यस्फोटांची माळ
- मुख्यमंत्री महोदय, भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील ३२ वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती.
- मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांसोबत उभे राहा.
- मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले.
- उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या गैरकृत्यांची माहिती दिली.
- तेथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले.
- शरद पवार यांच्याकडे तक्रार करुनही अनिल देशमुखांवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
- सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
- फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी तसे सांगितले.
- त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. त्यावेळी तेथे घरातील कर्मचारीही हजर होते.
शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितले. - अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना सांगितले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील.
- राहिलेली इतर रक्कम इतर धंद्यांकडून जमा करता येईल.
परमबीर सिंह यांचे महास्फोटक पत्र