मुक्तपीठ टीम
आरोग्य विभागाच्या परिक्षेत घोटाळ्यातील आरोपी बीडचा संजय शाहुराव सानपचे राजकीय संबंध चर्चेत आले आहेत. त्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. साधा जीप ड्रायव्हर असणारा संजय सानप थेट राज्यातील मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत संधान बांधून राज्याला हादरणारा मोठा घोटाळा कसा करु शकला, याची बीडमध्ये चर्चा सुरु आहे.



भाजपातील मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगून, त्यांच्यासोबतची छायाचित्र दाखवतच तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध जुळवत असे. त्यामुळेच त्याला जीपचालकापासून आलिशान गाड्या चालवणारे ड्रायव्हर सोबत बाळगण्याइतपत बळ मिळाले. त्याचा गावात तर बंगला आहेच पण बीडमध्येही एक घर आणि अकरा-बारा हजार चौरस फुटांचा बंगलाही मिळवता आला. त्याच्या मालमत्तेच्या स्त्रोतांची चौकशी झाल्यास अनेकांशी असलेले त्यांचे अर्थपूर्ण संबंध उघड होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आता आरोग्य सेवा गट ड परिक्षा घोटाळ्यात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात बीड जिल्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आलीय.
— Sanjay Sanap (@SanjayS14350458) September 10, 2020
कोण आहे संजय सानप?
- संजय सानप बीडमधील पाटोदा तालुक्यातील वडझरी गावचा आहे.
- तो जीप चालवत असे.
- पुढे तो भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आला.
- तेव्हापासून अनेक वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे.
- संजय सानप हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पाटोदा तालुकाध्यक्ष होता.
- भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंसह इतर काही नेत्यांसोबतचे फोटो मिरवत तो अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडत असे.
- त्याचा फायदा उचलत तो सरकारी ठेकेदारांना कंत्रांटं मिळवून देत असे.
- त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशाच्या बळावर तो राजकारणातही पुढे जात होता.
- त्याचाच गावचे राजेंद्र सानप हे शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक होते.
- त्यांच्या माध्यमातूनच त्याने आरोग्य विभागात गैरमार्गाने लावले.

गुणवंत विद्यार्थी अभ्यास करत होते, संजय सानप मंगलकार्यालयात पेपर फोडत होता!
- आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले यानं परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर पेपर फोडला होता.
- पेपर फोडीच्या रॅकेटमध्ये संजय सानप मोठी भूमिका पार पाडत होता.
- तो आणि त्याच्या संपर्कातील आरोग्य विभागातील काही कर्मचारी पैसे देऊ शकणारे उमेदवार शोधत असत.
- जे पैसे देत त्यांनाच पेपर दिला जात असे. त्यांचीच सरकारी नोकरीसाठी वर्णी लागत असे.
उमेदवारांकडून लाखो रुपयांची वसूली!
- संजय सानपने पेपरसाठी विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
- त्याचे रॅकेट शेकडोंना पेपर देत असत.
- त्याची भूमिका उघड झाल्याने आरोग्य विभाग भरती परीक्षेतील रॅकेट उच्च अधिकाऱ्यांपासून ग्रामीण भागापर्यंत पसरल्याचे दिसत आहे.
संजय सानपच्या चौकशीत सूत्रधार उघड होणार?
- राजेंद्र सानपच्या चौकशीतून संजय सानपचे नाव पुढे आले.
- ते दोघेही बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी गावचा आहे.
- सध्या तो त्या गावचा उपसरपंचही आहे.
- त्याचा भाऊ जीवन सानप यांचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
- सध्या बीड, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्यातील चार एमपीडब्ल्यू कर्मचारी लोकांच्या संपर्कात नाहीत, त्यांचीही चौकशी गरजेची मानली जात आहे.