मुक्तपीठ टीम
मॅजेस्टिक प्रकाशनने भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीला दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून घेतलेल्या कांदबरीलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि एकमेव पारितोषिक मिळवणारी, प्रतिभावंत लेखक प्रा. अविनाश कोल्हे लिखित ‘पंगतीतलं पान’ ही अत्यंत वेगळी कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’च्या ऑडिओबुकमध्ये साहित्यप्रेमींच्या भेटीस येत आहे. या कादंबरीत लेखकाने ‘हिंदू’तील संशोधक खंडेरावचे जग आणि गावकी – भावकीच्या गुंत्यातून काढलेला त्याने मार्ग, हा धागा निवडला असून वऱ्हाडी ठसकेबाज भाषेतून रंगविलेला पंगतीतल्या पानावरील कॅनव्हास लोकप्रिय कवी गायक अभिनेता संदीप खरे यांच्या कणखर आवाजात ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये ऐकताना साहित्यरसिक मग्न होऊन जातात.
समाजाच्या केंद्रस्थानी असलेली गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले! गुलाब धांडे -पाटील तसा मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण, जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री – पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. विदर्भातील अकोला – बुलडाणा – खामगाव – नांदुरा परिसरातील वऱ्हाडी बोलींचा वापर करून, वऱ्हाडातील पाटील – देशमुखांच्या घरंदाज घराण्यातील अंतर्गत कलह, आयुष्याला पोखरणाऱ्या भोवऱ्यांतून मुक्त होण्याची नवीन पिढीची धडपड, आपल्या खास कथनशैलीने ‘पंगतीतलं पान’ या स्वतंत्र कादंबरीतून लेखक प्रा. अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केली असून प्रतिभावंत कवी, गायक अभिनेते संदीप खरे यांच्या बहारदार शैलीत स्टोरीटेल मराठीवर ऐकताना श्रोतेही रंगून जातात.
लेखक प्रा. अविनाश कोल्हे हे मुंबईतील डी. जी. रूपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अलीकडेच निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. ‘चीनमधील मुस्लीम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर पीएच.डी. पदवीसाठी संशोधन काम सध्या ते करीत आहेत. गेली ३८ वर्षे त्यांनी ‘साप्ताहिक माणूस’च्या संपादनासह अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांचे चरित्र’ आणि ‘भारताची फाळणी’ ही दोन पुस्तके भाषांतरित केली असून, गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्रही लिहिले आहे.
चौकटीबाहेरचा मार्ग स्वीकारून, एकविसाव्या शतकातील तारुण्यात पदार्पण करणाऱ्या नवनायक गुलाब धांडे पाटलाची कहाणी ऐक्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठीसह सर्व ११ प्रादेशिक भाषेमधील पुस्तके योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.