मुक्तपीठ टीम
तसे शेंडी ठेवणारी माणसं आता कमीच दिसतात. धार्मिक कारणास्तव काही व्यक्ती मात्र आवर्जून शेंडी राखतात. त्यांचा शेंडीसाठी एक वेगळा आग्रह असतो. शेंडीबद्दल कोणी चेष्टा केलेलीही त्यांना स्वाभाविकच खपत नाही. अशावेळी जर ती शेंडीच नाहीशी झाली तर? स्वाभाविकच असा शेंडीप्रेमी माणूस जमदग्नीचा अवतार धारण करतोच करतो. मात्र, आजवर यामुळे कधी गुन्हा दाखल झाल्याचं कानावर आलं नव्हतं, आता मात्र तसं घडलंय. एका पंडितजींची शेंडी कापली गेल्यामुळे त्यांनी सलूनवाल्यावर गुन्हा दाखल केला आहे.
डेहरादूनच्या एका पंडितजींची चक्क शेंडी कापल्याची घटना घडली आहे. नेहमीच्या सलूनवाल्याकडे केस कापायला गेलेले पंडितजी शिवानंद कोटनाला जेव्हा केस कापून घरी आले, तेव्हा आपल्या डोक्यावरील शेंडी गायब झाल्याचं त्यांना समजले. ते पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी सलूनचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
- डेहराडूनच्या नवाडा भागात राहणारे पंडित शिवानंद कोटनाला रविवारी भावेश सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते.
- केस कापून झाल्यावर त्यांनी त्यांच्या केसांना कलरही करून घेतला.
- घरी आले आणि एका तासानंतर रंग वाळल्यानंतर आंघोळीला गेले.
- डोक्यावरून पाणी ओतून घेताना सलूनमध्ये केस कापताना आपली शेंडीदेखील कापली गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
- तेव्हा त्यांना राग आला आणि ते ते सलूनपाशी पोहोचले.
- शेंडी कापल्याच्या मुद्द्यावरून पंडितजी आणि सलूनवाल्यामध्ये भांडण झालं.
- त्याच रागात पंडितजींनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली.
- पंडित शिवानंद कोटनाला यांनी धार्मिक भावना दुखावणे, शिविगाळ करणे, मारपीट करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, असे गुन्हें सलून चालकाविरोधात नोंदवण्यात आले आहेत.
- पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत.