मुक्तपीठ टीम
भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता लढत नेमकी कोणात होणार ते स्पष्ट होऊ लागले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रमुख पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार आज घोषित केले आहेत. राष्ट्रवादीने दिवंगत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे.
राष्ट्रवादी निवडणुकीत कोणता उमेदवार उतरवणार हे पाहून त्यानंतरच आपण उमेदवार द्यायचा, अशी रणनीती भाजपनं आखली होती. मात्र, बराच काळ वाट पाहिल्यानंतरही राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे अखेर भाजपाकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भाजपा उमेदवार पूर्वीचा शिवसेनेचा!
समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायात आहेत. ते सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक आणि सोलापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते त्यांच्या कामामुळे संबंधित संस्थांशी उत्तम संबंध राखून आहेत. अवताडे यांनी याआधी दोनवेळा आमदारकीसाठी प्रयत्न केला होता. २०१४ साली शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढले. त्यानंतर ते भाजपात सक्रिय झाले. मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने २०१९ ला त्यांनी अपक्ष लढत देताना चांगली मते मिळवली होती.
राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदारांचे सुपुत्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी द्यावी असे मत होते. पण त्याऐवजी राष्ट्रवादीने आता त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. भगीरथ हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
स्वाभिमानीची वेगळी वाट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाविरोधातील मित्रपक्षाच्या वेगळ्या भूमिकेने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे.
शिवसेनेतून बंडाचा झेंडा
एकीकडे २०१४मध्ये शिवसेनेतून लढलेले अवताडे भाजपाच्या कमळावर लढत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखांनीही बंडाचा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्यावेळी त्यांनी उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली. आता आघाडीमुळे पक्षच लढत नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत.