मुक्तपीठ टीम
कोकण म्हटलं की आठवतं ते दक्षिण कोकणच. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. फारतर रायगड. पण उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील सौंदर्यही काही कमी नाही. त्यातही जव्हारसारख्या अतिदुर्गम भाग म्हणजे मिनी महाबळेश्वरच! तेथेच असलेला दाभोसा धबधबा निसर्गाच्या कुशीतून बदाबदा कोसळणारा धबधबा…सोबतच अप्रतिम सौंदर्यही पसरवणारा. हा धबधबा गेली काही वर्षे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू बनत चालला आहे.
जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून हा धबधबा २० किलोमीटरवर आहे. तिथं हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलाय दाभोसा धबधबा. धबधब्याची ऊंची किमान ३०० फूट असावी. सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा या गावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्हयासह ठाणे, मुंबई तसेच गुजरात, नाशिक आणि सिल्व्हासामधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महीने सुरु असतो. त्यामुळे पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात धबधब्याच्या सभोताली हिरवाई दिसत असल्याने सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे येताना पहायला मिळतात.
दाट धुकं आणि सतत कोसळणाऱ्या जलधारा हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे निसर्ग सौंदर्याची उधळण दिसत असल्याने बाराही महिने वातावरण प्रसन्न असतं. दाभोसाच्या या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचींवरून हे पाणी खाली पडत तितक्याच वेगाने त्याचे तुषार ५०-६० फुटांपर्यंत वर उडतात. हे तुषार अगांवर झेलण्याचा आंनदच काही वेगळा. तो शब्दांमध्ये मांडणार कसा. तुम्हीच या आणि अनुभवा.
पाहा व्हिडीओ: