मुक्तपीठ टीम
दहशतवादी घातपातात वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्या पाकिस्तानकडे कोरोनाच्या संकटाशी झुंजण्याचेही बळ नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडत असतानाही म्हणावी तेवढी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचे आरोप तेथील सरकारवर होत असतात. आता मात्र भारताकडून कोरोना लसींच्या रुपाने पाकिस्तानी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत पाकिस्तानला दीड कोटी डोस मोफत पुरवणार आहे.
‘द नेशन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन होत असलेली लस द ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अन्ड इम्यूनायजेशनच्या माध्यमातून पाकिस्तानला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही संस्था गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी तयार केली गेली आहे. कोरोना लसीचा पहिली खेप मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये पोहचणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर जूनपर्यंत दीड कोटी डोस लस पाकिस्तानमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भारत ६५ देशांना कोरोनाची लस पुरवत आहे. यामध्ये बऱ्याच देशांना अनुदानाच्या आधारे लस दिली जात आहे, तर इतर देश भारत सरकारने निश्चित केलेली किंमत देऊन लस घेत आहेत. श्रीलंका, भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या देशांना भारताने मदत म्हणून जवळपास कोरोना लसीचे ५६ लाख डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
या देशांपर्यंत पोहोचली ‘मेड इन इंडिया’ लस…
ज्या देशांमध्ये कोरोना लस दिली गेली आहे त्या देशांमध्ये बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका, बहरीन, ब्राझील, मोरोक्को, ओमान, इजिप्त, अल्जेरिया, दक्षिण आफ्रिका, कुवैत, संयुक्त अरब अमिराती , अफगाणिस्तान, बारबाडोस, डोमिनिका, मेक्सिको, डोमिनिकन रिपब्लिक, सौदी अरेबिया, अल साल्वाडोर, अर्जेंटिना, सर्बिया, मंगोलिया, युक्रेन, घाना, आयव्हरी कोस्ट, सेंट लुसिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सूरीनाम, अँटिगुवा आणि बारबुडा, डीआर कांगो, अंगोला, गॅम्बिया, नायजेरिया, कंबोडिया, केनिया, लेसोथो, रवांडा, साओ टोम अन्णि प्रिन्सिपे, सेनेगल, ग्वाटेमाला, कॅनडा, माली, सुदान, लाइबेरिया, मलावी, युगांडा, गुयाना, जमॅका, ब्रिटन, टोगो , जिबूती, सोमालिया, सेरा लिओन, बेलिझ, बोत्सवाना, बोट्सवाना, मोझांबिक, इथिओपिया आणि ताजिकिस्तान यांचा समावेश आहे.