मुक्तपीठ टीम
तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हा आरोप पाकिस्तानच्या यूनोमधील माजी राजदूत आबिदा हुसेन यांनी केला आहे. एकप्रकारे ते अल कायद्याचा सूत्रधार ओसमा बिन लादेनच्या पे रोलवरच होते असा आरोप झाल्याने खळबळ माजली आहे.
नवाझ शरीफ पंतप्रधान असताना आबिदा हुसेन त्यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली जात आहे.
आबिदांनी उघड केलेले ना’पाक’ दहशत संबंध
• पाकिस्तानच्या मुख्य नेत्यांचे दहशतवाद्यांशी थेट संबंध आहेत.
• एवढेच नव्हे तर त्यांना दहशतवाद्यांकडून पैसे मिळतात.
• त्या पैशाचा वापर ते भारतातील काश्मीरमधील जिहादसाठी करतात
• माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अल-कायदा या संघटनेचा दहशतवादी ओसामा बिन लादेन आर्थिक मदत करत असे
दहशतवादी संबंधांचे याआधीही झाले आरोप
• २०१६ मध्येही एका पुस्तकात नवाझ शरीफ अल-कायदा या दहशतवादी संघटनेकडून पैसे घेत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता.
• सत्तारूढ पक्ष तहरीक-ए-इंसाफचे खासदार फर्रुख हबीब यांनीही नवाझ शरीफ यांनी लादेनकडून १० कोटी डॉलर्स घेऊन बेनझीर भुट्टो यांच्या सरकारला पाडल्याचा आरोप केला आहे.
• पाकिस्तानमधील विरोधीपक्ष नेत्यांनीही इम्रान सरकारच्या परदेशी देणग्यांकडे लक्ष वेधले आहे.
अमेरिकेने २०११ मध्ये पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये मध्यरात्री एका विशेष कारवाईत ओसामा बिन लादेनला ठार केले होते. लादेनला ठार करेपर्यंत पाकिस्तान लादेन आपल्या देशात असल्याचे नाकारत होता. मात्र, आता आबिदा हुसेन यांनी नवाझ शरिफ यांच्यावर लावलेल्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.