मुक्तपीठ टीम
मुंबईत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी मुंबईत कुत्रा चावण्याच्या अधिक घटना समोर आल्या आहेत. मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, दर ९ तासात एक घटना घडली आहे. यामध्ये रेबीजचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही किंवा रेबीजमुळे कोणाचा मृत्यूही झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. या भटक्या कुत्र्यांची लोकांमध्ये दहशत पसरली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या भटक्या कुत्र्यांना लोक बळी पडत आहेत. गेल्या ८ महिन्यांत सुमारे ५० हजार ६२२ लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
देवनार कत्तलखान्याचे जीएम डॉ कलीम पाशा पठाण यांनी सांगितले की, ‘हे भटके कुत्रे लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर हल्ला करतात. काहीवेळा कुत्रे उन्हाळ्यात पाण्याअभावी अस्वस्थ होतात आणि थोड्याशा छेडछाडीवर ते हल्ला करतात.’
मुंबई मनपाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, ‘या सगळ्यात आनंदाची बातमी अशी आहे की, या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजची एकही घटना गेल्या ४ वर्षांत नोंदवण्यात आलेली नाही किंवा एकाही व्यक्तीला रेबीजची लागण झालेली नाही. दवाखाने आणि रुग्णालयांसह सुमारे १६० केंद्रांमध्ये अँटी रेबीज लस उपलब्ध आहे.’
रेबीज म्हणजे काय?
- रेबीज हा संसर्गजन्य रोग नाही.
- कुत्रे आणि मांजर यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या चाव्यामुळे किंवा ओरखड्यांमुळे हा आजार होतो.
- जेव्हा संक्रमित प्राण्याची लाळ पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमेच्या संपर्कात येते तेव्हा असे होते.
- पाळीव कुत्री, मांजरी यांना वर्षातून एकदा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रेबीजची लसीकरण करणे आवश्यक आहे.
रेबीज रोगाची मुख्य लक्षणे कोणती?
रेबीज आजार हा संक्रमित प्राणी चावल्यानंतर होतो. काही दिवसात त्याची लक्षणं दिसून येतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे दिसण्यासाठी अनेक दिवस ते अनेक वर्षे लागतात. रेबीजची पुढील लक्षणे दिसू लागतात-
- वेदना होणे
- थकवा जाणवणे
- डोकेदुखी
- ताप येणे
- स्नायू घट्ट होणे
- चिडचिड होणे
- अस्वस्थ वाटणे
- विचित्र विचार येतात
- अशक्तपणा आणि अर्धांगवायू
- लाळ आणि अश्रू
- बोलायला खूप त्रास होतो