मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानासाठी केलेल्या आवाहनानुसार भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपवनरसंरक्षक कार्यालय नांदेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करण्याचे आव्हान करताना शिबीराचे आयोजक आणि वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष एस.बी घोडके यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमा दरम्यान ते म्हणाले की, “सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये रक्त साठा कमी झाला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी समजून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मानवी मूल्यांची जपवणूक करावी”.
“रक्तदान हेच जीवनदान आहे.” हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिराव फुले, थोर समाज सुधारक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत विश्वकर्मा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्रमध्ये आज खऱ्या अर्थाने मानवाला एक दुसऱ्याच्या मदतीची, सहानुभूतीची आणि दायित्वाची गरज भासत आहे”, असे एस. बी. घोडके म्हणाले.
तसेच “प्रचंड रक्त तुटवडा निर्माण झाला असताना आपल्यासारख्या मर्द मावळ्यांनी राष्ट्रसंताच्या, थोर महामानवाच्या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्वांनी रक्तदान हे केलंच पाहिजे. थोर समाज सुधारक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. मानवी कल्याणासाठी आयुष्य वाहून घेतले. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा केली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किमान आपण ३०० एमएल रक्त हे दान करून सामाजिक बांधीलकी जपावी. कोरोना सारख्या प्रचंड महामारीच सावटात आपला देश आपला महाराष्ट्रवर असताना मृत्यूच्या छायेत असलेल्या रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आज आपण चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन रक्तदान हे महत्त्वाचं दान केले पाहिजे आणि आपण रक्तदान नक्की कराल अशी आशा बाळगतो”, असे ते पुढे म्हणाले.
आपली सामाजिक बांधिलकी समजून घेऊन आपण नक्कीच रक्तदान करावे, असे कळकळीचे विनंती एस. बी. घोडके यांनी केली आहे. तसेच या कार्यक्रमाला आर.ए. सातेलिकर उपवनसंरक्षक नांदेड, डी.एस.पवार सहाय्यक वनसंरक्षक नांदेड, एस.जी.कवळे वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड, आर.जी.झाडे वनपाल नांदेड आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.