रोहिणी ठोंबरे / टीम मुक्तपीठ
“नागरिकांना शहरात राहायला आवडले पाहिजे, सोयी सुविधा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत, तर त्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होतोय असे म्हणता येईल. मुंबईचा विकास गेली अनेक वर्षे होत आहे परंतु मागील काही वर्षांमध्ये जगभर वातावरणीय बदल होत असल्याने शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. गजेंद्र देवडा यांच्यासह विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
#ColabaConversation | Watch @AUThackeray as he interacts with young minds on #climate, culture, #commerce, connectivity & the future course for #Mumbai, hosted by @akshmathur.https://t.co/phk5riXHVm
— ORF (@orfonline) December 1, 2021
या परिसंवादाचे आयोजन ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडंट येथे करण्यात आले होते. ‘युथ टाऊनहॉल विथ कॉलेज स्टुडंट (आमची मुंबई)’ या परिसंवादामध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील साठ्ये, झेवियर्स, एचआर, मेघनाद देसाई, वेलिंगकर, रूईया, नॅशनल आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसमवेत कॉमर्स, कनेक्टिव्हिटी, कल्चर, क्लायमेट आदी विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ओआरएफचे संचालक अक्षय माथूर यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
वातावरणीय बदलांकडे वेधले लक्ष
आदित्य ठाकरे म्हणाले, “डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. हे वातावरणीय बदलाचेच लक्षण आहे. याचा फटका शेतीपासून उद्योगांपर्यंत आणि दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांनाही बसतो. हा बदल रोखण्यासाठी शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबर सर्वांनीच आपल्या दैनंदिन सवयींमध्ये पर्यावरणपूरक बदल करणे गरजेचे आहे.”
आदित्य ठाकरेंनी मांडला पर्यावरणस्नेही मुंबईचा फ्यूचर प्लान
- मुंबईसह राज्यातील सर्व मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांद्वारे होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
- मुंबईत २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक बसद्वारे होईल, त्याअनुषंगाने बेस्टद्वारे २१०० बसेस खरेदीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
- येत्या आर्थिक वर्षापासून नवीन खरेदी होणारी सर्व शासकीय आणि निमशासकीय वाहने ही इलेक्ट्रीक वाहने असतील.
- चार्जिंग स्थानके वाढविण्यावरही भर दिला जात आहे.
- मुंबईतील सर्व नद्या स्वच्छ करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
- पुढील काही वर्षात याचे दृश्य परिणाम दिसून येतील.
- शहरातील घनकचऱ्याचे विलगीकरण केले जात असून सुक्या कचऱ्याचे प्रमाण आता कमी होत आहे.
- ओल्या कचऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जात आहे.
- इमारतींवरील पाणी जमिनीत मुरविले जात आहे.
- शहरातील हरीत क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महामार्गांभोवती झाडे, सौर ऊर्जेसह रेस टू झीरो!
आदित्य ठाकरे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांच्या परिसरात झाडे लावली जात आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढविला जात आहे. ४३ अमृत शहरांच्या माध्यमातून वसुंधरेच्या संरक्षणासाठी रेस टू झीरोकडे वाटचाल सुरू करण्यात येऊन कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वातावरणीय बदल परिषद स्थापन करण्यात आली असून या क्षेत्रात सर्व संबंधित विभाग एकत्र येऊन काम करीत आहेत.
पर्यटनस्थळांचा पर्यावरणपूरक विकास!
राज्यात पर्यटनासाठी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, या पर्यटनस्थळांचा देखील पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.